गूगलने प्ले स्टोअरवरून हटवले ‘Remove China Apps’


नवी दिल्ली : सध्या चीन विरोधातील भावनांनी भारतात जोर धरला असून त्यातच आता देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या मोबाईलमधील चीनी अॅप डिलीट करण्याचा धडाकाच लावला आहे. याच दरम्यान देशभरात अँडॉईड फोनमधील चिनी अॅप्स ओळखून डिलीट करण्याचा दावा करणारे रिमूव्ह चायना अॅप (Remove China App) व्हायरल झाले होते. पण आता हे अॅप गूगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आले आहे.

हे अॅप भारतात फार कमी वेळातच लोकप्रिय झाले होते. गूगल प्ले स्टोअरच्या टॉप फ्री अॅप्सच्या यादीत या अॅपने अल्पवधीतच स्थान मिळवले होते. हे अॅप फक्त काही आठवड्यांमध्येच 50 लाखांपेक्षा जास्त वेळा डाऊनलोड करण्यात आले होते. तर 1.89 लाख रिव्ह्यू आणि 4.9 स्टार या अॅपला मिळाले होते. या आकडेवारीवरुन या अॅपच्या लोकप्रियतेचा अंदाज बांधता येईल. कोरोना संकट आणि भारत-चीन सीमेवरील तणाव यासारख्या कारणांमुळे देशभरात चीनविरोधात रोष आहे.

गेल्या महिन्यातील 17 तारखेला रिमूव्ह चायना अॅप हे अॅप लॉन्च करण्यात आल्यानंतर या अॅपला भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर पसंती दर्शवली. देशात मोठ्या प्रमाणावर हे अॅप लोकप्रिय होण्यामागे अनेक कारणे आहेत. भारत-चीन सीमेवरील तणाव आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव यांमुळे देशावर आलेले संकट हे त्यातील महत्त्वाचे कारण मानले जात आहे.

सध्या चीनविरोधातील भारतीय नागरिकांमध्ये भावना तीव्र झाल्या आहेत. दरम्यान या अॅपच्या माध्यमातून टीक-टॉक आणि युसी ब्राउझर यांसारखे कथित चीनी अॅप्स डिलीट केले जाऊ शकतात, असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान, शैक्षणिक उद्देश समोर ठेवून हे अॅप तयार केल्याचे अॅप तयार करणाऱ्या ‘वन टच अॅप लॅब्स’ने सांगितले आहे. त्यांनी सांगितलं की, अॅप डेव्हलपर्स व्यावसायिक उद्देशांसाठी हे अॅप वापरू शकत नाहीत.


गूगलने प्ले स्टोअर वरून हे अॅप का हटवले त्यामागील कारण मात्र अद्याप स्पष्ट केलेले नाही. तसेच पुन्हा हे अॅप प्लेस्टोअरवर उपलब्ध होणार की, नाही याबाबतही गूगलने कोणतीच माहिती दिलेली नाही. जयपूरची कंपनी असलेल्या ‘वन टच अॅप लॅब्स’ने आपल्या ट्विटमध्ये सांगितले आहे की, ‘रिमूव्ह चायना अॅप’ गूगलने प्ले स्टोअरवरून सस्पेंड केले आहे.

Leave a Comment