सावधान ! या फोटोमुळे स्मार्टफोन होत आहेत क्रॅश

एका वॉलपेपरमुळे स्मार्टफोन क्रॅश होत असल्याची तक्रार अनेक युजर्सनी सोशल मीडियावर केली आहे. या वॉलपेपरमध्ये डोंगर, ढग आणि विविध रंगामध्ये झरा दिसत आहे. मात्र हा वॉलपेपर ठेवताच अँड्राईड स्मार्टफोन क्रॅश होत असल्याचे समोर आले आहे. एका विशिष्ट कंपनीच्या फोनमध्ये ही समस्या आढळली नाही. मात्र गुगल आणि सॅमसंग तसेच अँड्राईड 10 व्हर्जन असलेल्या स्मार्टफोनमध्ये ही समस्या येत आहे.

आइस यूनिव्हर्स नावाच्या ट्विटर युजरने याबाबत सुचना देणारे ट्विट केले होते. सोबतच वॉलपेपर देखील शेअर केला होता. मात्र अनेक युजरने या सुचनेला गंभीरतेने न घेता नक्कीच हा वॉलपेपर ठेवल्यावर फोन क्रॅश होते का ते तपासून पाहिले व त्यांचा फोन क्रॅश होऊ लागला.

गुगल आणि सॅमसंगच्या फोनला याची सर्वाधिक समस्या आली आहे. अँड्राईड ऑथिरिटीचे बोगडन पेट्रोव्हान म्हणाले की, या फोटोमुळे गुगल पिक्सल 2 फोन क्रॅश झाला. मात्र ह्युवाई मेट 10 प्रोला काहीही समस्या आली नाही. यावरून स्पष्ट होते की सर्वच अँड्राईड फोनमध्ये ही समस्या येत नाही. काही वनपल्स, नोकिया आणि शाओमीच्या फोनमध्ये देखील ही समस्या आली. तर गुगल पिक्सल 4 एक्सएल जो डेव्हलपर प्रिव्ह्यू अँड्राईड 11 वर चालतो त्यात समस्या आली नाही. आयफोन देखील हा वॉलपेपर ठेवल्यावर क्रॅश झाले नाहीत.

क्रॅश झाल्यानंतर फॅक्ट्री रिसेट केल्यावरच पुन्हा फोन सुरू होतो. म्हणजेच हा वॉलपेपर ठेवल्यास तुमच्या फोनमधील सर्व डेटा जाऊ शकतो. यामागील अचूक कारण अद्याप समजू शकले नाही. मात्र काही तज्ञांचे म्हणणे आहे की अँड्राईड सिस्टममध्ये रंगाबाबत बग असू शकतो. गुगल अँड्राईड ऑपरेटिंग सिस्टममध्ये स्टँडर्ड आरजीबी फॉर्मेट देत असते. मात्र काही फोटो एसआरजीबी फॉर्मेटमध्ये नसतात. त्यामुळे ही समस्या येऊ शकते. तर अँड्राईड ओपन सोर्स प्रोजेक्टचे मुख्य डेव्हलपर डेव्हिड बिआंको यांच्यानुसार, त्यांनी पॅच सबमिट केला असून ही समस्या सोडवली आहे.

Leave a Comment