कोरोनाचे एक संकट राज्यासमोर असतानाचा आणखी एक मोठे संकट राज्यासमोर उभे राहिले आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीला उद्या म्हणजेच तीन जून रोजी निसर्ग चक्रीवादळ धडकणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये या चक्रीवादळामुळे उद्या काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
कोणी बरे केले असेल उद्या राज्याच्या किनारपट्टीला धडकणाऱ्या चक्रीवादळाचे नामकरण?
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर या चक्रीवादळची तीव्रता देखील पुढील २४ तासांत वाढणार आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबईसह उपनगरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. बांगलादेशने या चक्रीवादळाला निसर्ग असे नाव दिले आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) गेल्या महिन्यात उत्तर हिंदी महासागरामध्ये निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांच्या नावांची नवी यादी प्रसिद्ध केली होती. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरालगतच्या देशांनी सुचवलेल्या नावांचा समावेश या यादीमध्ये कऱण्यात आला होता. अरबी समुद्रातील आगामी चक्रीवादळापासून या नव्या यादीतील पहिले नाव निसर्ग असून जे बांगलादेशने सुचवले आहे. ६४ नावाची यादी २००४ मध्ये तयार केली होती. या यादीतील अखेरचे नाव गेल्या आठवड्यात आलेल्या आम्फान चक्रीवादळाला देण्यात आले आहे. त्यानंतर आता तीन तारखेला धडकणाऱ्या चक्रीवादळाला नव्या यादीतील पहिले नाव देण्यात आले आहे.
ज्या ज्या देशांना चक्रीवादळाचा धोका बसण्याची शक्यता असते ते सर्व देश एकत्र येऊन वादळांच्या नावांची यादी तयार करतात. या वादळांना फुले, नद्य, विशेष शब्द, प्राणी यांची नावे दिली जातात. भारत, बांगलादेश, पाकिस्तान, मालदीव, ओमान, श्रीलंका, म्यानमार व थायलंड या आठ राष्ट्रांनी भारतीय उपखंडातील वादळांची नावे ठरवली आहेत. इतर राष्ट्रांकडूनही प्रत्येकी आठ अशी ६४ नावे देण्यात येतात. ओळीने ही नावे देण्यात येतात. याच पद्धतीने पृथ्वीवरील इतर भागातील वादळांची नावे ठरवली जातात. विशिष्ट वर्षांनंतर पुन्हा तिच नावेही काही ठिकाणी दिली जातात, अर्थात त्यातून प्रचंड संहारक ठरलेल्या वादळांची नावे वगळली जातात.