भीम अ‍ॅपच्या 70 लाख युजर्सचा डेटा लीक ? सरकारने दिले स्पष्टीकरण

मोबाईल पेमेंट अ‍ॅप भीमच्या 70 लाखांपेक्षा अधिक युजर्सची खाजगी माहिती लीक झाल्याचे समोर आले आहे. इस्त्रायल सायबर सिक्यूरिटी वेबसाईट vpnMentor च्या रिपोर्टमध्ये या संदर्भात माहिती देण्यात आली आहे. मात्र नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) डेटा लीक झाला नसल्याचे म्हटले आहे.

सायबर सिक्यूरिटी वेबसाईटने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की 409 गीगाबाईट डेटा लीक झाला असून, यामध्ये आधार कार्डची माहिती, जातीचे प्रमाणपत्र, रहिवाशी पुरावा, बँकेची माहिती व युजर्सच्या खाजगी माहितीचा समावेश आहे.  भीम वेबसाईटचा उपयोग एका कँम्पेनसाठी युजर्स आणि बिझनेस मर्चेंट्सला अ‍ॅपमध्ये साइन-अप करण्यासाठी केला गेला. या संबंधित डेटाला अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसेजच्या एस3 बकेटमध्ये ठेवण्यात आले होते, जेथे हा डेटा सर्वांसाठी उपलब्ध होता.

वेबसाईटने म्हटले आहे की डेटा लीकचे प्रमाण मोठे असल्याने देशभरातील लाखो युजर्सवर याचा परिणाम होऊ शकतो. याचा हॅकर्स आणि सायबर गुन्हेगार फसवणूक, चोरीसाठी वापर करू शकतात.

डेटा लीकबाबत एनपीसीआयने दावा फेटाळला असून, त्यांनी म्हटले की, भीम अ‍ॅपचा कोणताही डेटा लीक झालेला नाही. एनपीसीआय आपल्या इंफ्रास्ट्रक्चरला वाचवण्यासाठी सर्वोत्तम दर्जाची सुरक्षेचा वापर करते.

Leave a Comment