मुंबई – जो कमी दाबाचा पट्टा अरबी समुद्रात होता, त्याचे आता चक्रीवादळात रुपांतर झाले असून हे चक्रीवादळ आगामी बारा तासांमध्ये अजून तीव्र होणार आहे. तेथील वाऱ्याचा वेग ताशी १०० ते ११० किमी एवढा असेल. १२० पर्यंत देखील तो पोहोचण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याच्या मुंबईच्या दक्षता अधिकारी शुभांगी भुते यांनी दिली आहे.
अखेर त्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रुपांतर
भुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईपासून ४३० किमी दूर तर गोव्यापासून २८० किमी दूर हे चक्रीवादळ आहे. हे चक्रीवादळ ३ जूनच्या दुपारपासून दमण आणि हरिहरेश्वरपासून अलिबागच्याजवळ रायगड जिल्हा ओलांडण्याची शक्यता आहे. या तीव्र चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठाणे, पालघर, मुंबई आणि रायगडमधील काही ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यावेळी वाऱ्यांचा वेग हा ताशी १०० ते ११० किमी असेल. हे चक्रीवादळ या भागातून ज्यावेळी जाईल तेव्हा संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.