साठवलेल्या पैशातून तीन मजुरांची १२ वर्षाच्या मुलीने केली विमानाने घरवापसी - Majha Paper

साठवलेल्या पैशातून तीन मजुरांची १२ वर्षाच्या मुलीने केली विमानाने घरवापसी


देशातील कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस उग्र रुप धारण करत आहे. त्यावर खबरदारीचा उपाय म्हणून सध्या देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. देशात सध्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु आहे. त्यातच लॉकडाउनमुळे स्वतःच्या मूळ गावी परतणाऱ्या लाखो स्थलांतरित मजुरांचे हाल होत आहेत. पण या संकट काळात अनेक असे लोकही समोर आले आहेत, ज्यांनी आपल्या स्वतःच्या खर्चाने मजुरांना घरी पोहोचवण्याचे काम केले. असेच कौतुकास्पद काम नोएडाच्या एका १२ वर्षांच्या मुलीने केले आहे. पिग्गी बँकमध्ये साठवलेल्या पैशांतून निहारिका दि्वेदी नावाच्या या मुलीने तीन मजुरांना थेट विमानाने त्यांची घरवापसी केली आहे.

यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, निहारिका आठवी इयत्तेची विद्यार्थीनी असून तिने साठवलेले जवळपास ४८ हजार रुपये दान केले असून तिने त्याद्वारे तीन मजुरांना विमानाने झारखंडमध्ये त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली. त्या तीन प्रवाशांपैकी एक कर्करोगाने ग्रस्त असल्याची माहिती आहे.


याबाबत प्रतिक्रिया देताना निहारिकाची आई सुरभी सांगतात की, बातम्या बघताना मजुरांना होणारा त्रास पाहून निहारिका फार दुःखी व्हायची, त्यातच आपण या लोकांना विमानाने पाठवू शकतो का असे तिने एक दिवस मला विचारल्यानंतर तिने साठवलेले पैसे आम्हाला दिले आणि मला त्या मजुरांची मदत करायची आहे असे म्हटले. आम्हाला देखील आमच्या मुलीचे ते म्हणणे ऐकून खूप आनंद झाला. आमच्या एका मित्राकडून आम्हाला तीन मजुरांना झारखंडला जायचे असल्याची माहिती मिळाली. त्यांच्यातील एक कर्करोगग्रस्त असल्याचेही समजल्यामुळे त्यांच्या तिकीटाची आम्ही व्यवस्था केली. तर, आपल्याला समाजाने बरच काही दिले आहे आणि समाजासाठी आता या अडचणीच्या काळात काहीतरी करावे ही आपली जबाबदारी असल्याचे निहारिकाचे म्हणने आहे. सध्या सोशल मीडियामध्ये निहारिकाच्या या कामाचे भरभरून कौतुक होत आहे.

Leave a Comment