लॉकडाऊन : घरी जाण्यासाठी चोरी केली होती बाईक, आता चक्क कुरियरने केली परत

तामिळनाडूच्या सिल्लूर जिल्ह्यातील 34 वर्षीय सुरेश कुमारची चोरी झालेली बाईक चक्क कुरियरने परत मिळाल्याचे समोर आले आहे. दोन आठवड्यांपुर्वी त्याची बाईक एका वर्कशॉपच्या पार्किंगमधून गायब झाली होती. त्याने पोलिसात तक्रार देखील दाखल केली, मात्र पोलिसांनी लॉकडाऊननंतर कारवाई केली जाईल असे सांगितले. यामुळे सुरेशने स्वतः बाईकचा शोध घेण्यास सुरूवात केली. त्याने आजुबाजूच्या सर्व व्हिडीओ फुटेज तपासले. एका फुटेजमध्ये त्याला बाईक घेऊन जाताना एक व्यक्ती दिसला. त्याने हे फुटेज आपल्या फोनमध्ये घेतले व सर्वांना बाईक चोराबाबत सांगितले. आजुबाजूच्या लोकांना व्हिडीओ दाखवल्यांतर त्यांनी या चोराला ओळखले.

सुरेशने सांगितले की, मला माहिती मिळाली की मन्नारगुडी येथील पारसनाथने बाईक चोरी केली आहे. तो एका बेकरीमध्ये काम करतो. तो आपल्या घरी गेला होता. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या पारसनाथला घरी जाण्यासाठी कोणतेही साधन नसल्याने त्याने बाईक चोरी केली व घरी गेला. जेव्हा त्याला समजले की बाईकच्या मालकाला त्याच्याविषयी समजले आहे, तेव्हा त्याने समस्या टाळण्यासाठी बाईकला परत पाठवण्याचा निर्णय घेतला.

सुरेशला कुरियरने बाईक परत मिळाली असून, त्याने सांगितले की, बाईक परत मिळाल्याने मी आनंदी आहे. ट्रांसपोर्टेशन चार्जेस म्हणून 1400 रुपये द्यावे लागले. मात्र बाईक व्यवस्थित आहे. पोलिसांना याबाबत माहिती दिली असून हे प्रकरण पुढे वाढवायचे नाही.

Leave a Comment