11वीच्या विद्यार्थीनीच्या परीक्षेसाठी या सरकारी विभागाने चालवली 70 सीटर बोट

केरळच्या 11वीत शिकणाऱ्या एका मुलीला परीक्षा देता यावी यासाठी राज्याच्या जल विभागाने चक्क 70 सीटर बोट चालवली आहे. या मुलीचे नाव सँड्रा असून, ती आपल्या पालकांसोबत अलाप्पुझा येथे राहते. तिचे आई-वडील मजूर आहेत. लॉकडाऊननंतर परीक्षेच्या नवीन तारखा जारी झाल्यानंतर तिला वाटले की ती परीक्षेला कोट्टयम येथे जाऊ शकणार नाही. कारण तिच्या घरापासून ते 30 किमी लांब आहे.

अखेर तिने राज्याच्या जल विभागाला फोन केला व आपली स्थिती सांगितली. यावर विभागाने देखील ज्या दिवशी तिची परीक्षा असेल तेव्हा बोटीची व्यवस्था केली जाईल असे वचन दिले. 70 सीटर बोटीत सँड्रा एकमेव प्रवासी होती. तरीही विभागाने सर्व क्रू उपस्थित असेल याची दक्षता घेतली. बोटीत एक चालक, बोट मास्टर आणि अन्य कर्मचारी होते.

बोटीने सँड्राला तिच्या घराजवळून घेतले व तिला कोट्टयम येथे परीक्षेच्या ठिकाणी सोडले. एवढेच नाहीतर तिची परीक्षा संपेपर्यंत तेथेच वाट पाहिली. जेणेकरून तिला पुन्हा घरी सोडता येईल. बोट सलग दोन दिवस सँड्राला परीक्षेच्या ठिकाणी पोहचवत होती. राज्य जल विभागाने केलेल्या मदतीमुळे तिला परीक्षा देता आल्याने ती आनंदी आहे.

Leave a Comment