…अन् पत्रकार परिषदे दरम्यानच अंडरग्राऊंड झाले डोनाल्ड ट्रम्प


वॉशिंग्टन – जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला असून त्याची झळ आता व्हाईट हाऊसपर्यंत देखील पोहोचली आहे. अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूनंतर आंदोलन सुरु असून काही ठिकाणी तर दंगली आणि हिंसाचार सुरु आहे. शुक्रवारी रात्री व्हाइट हाऊसच्या दिशेने जाण्यासाठी आंदोलनकर्ते बाहेर एकत्र आल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांना व्हाइट हाऊसच्या अंडरग्राऊंड बंकरमध्ये नेण्यात आले. जवळपास अर्धा तास डोनाल्ड ट्रम्प बंकरमध्ये होते. यानंतर त्यांना पुन्हा बाहेर काढण्यात आले. यासंदर्भातील वृत्त न्यूयॉर्क टाइम्सने दिले आहे.

व्हाइट हाऊसच्या दिशेने हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्ते येऊ लागल्यानंतर त्यांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न सिक्रेट सर्व्हिस आणि युनायटेड स्टेट्स पार्क पोलीस करत होते. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, व्हाइट हाऊसच्या बाहेर आंदोनकर्ते एकत्र आल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची टीम आश्चर्य व्यक्त करत होती.

अमेरिकेत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्यूनंतर हिंसाचार सुरु असून या आंदोलनाचे लोण अमेरिकेच्या वेगवेगळया भागांमध्ये पसरत चालले आहे. सोमवारी मिनियापोलिस शहरातील पोलीस कोठडीत जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय नागरिकाचा मृत्यू झाला. जॉर्ज फ्लायड यांना अटक करताना अधिकाऱ्याने त्यांच्या मानेवर गुडघा ठेवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून अमेरिकेत शुक्रवारपासून आंदोलने सुरु आहेत. दरम्यान जॉर्ज फ्लॉयड यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या मिनियापोलिस शहरातील पोलीस अधिकाऱ्याला शुक्रवारी अटक करण्यात आली. त्याच्यावर हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. पण त्याने आंदोलकांचे समाधान झालेले नाही. जवळपास १५ शहरांमध्ये आंदोलन सुरु असून अनेकांना अटकही करण्यात आली आहे.

Leave a Comment