हे आहे देशातील एकमेव स्वतंत्र कुबेर मंदिर

फोटो साभार आरटीव्ही टेम्पल

देवांचा सावकार, उत्तर दिशेचा दिग्पाळ आणि यक्षांचा अधिपती कुबेर, धन आणि विलासाची देवता मानला जातो. भारतात लाखो मंदिरे आहेत आणि त्यात अनेकदा बऱ्याच मुख्य शिवमंदिरात कुबेराचे छोटे देऊळ पाहायला मिळते. मात्र कुबेराचे स्वतंत्र असे देश विदेशातील एकमेव मंदिर उत्तराखंड राज्यात अल्मोडा येथे असलेल्या जगप्रसिध्द जागेश्वर महादेव मंदिराच्या जवळ आहे. प्राचीन ग्रंथात कुबेराचा उल्लेख निधीपती, वैश्रवण या नावानेही येतो.

प्रत्यक्ष ब्रह्माने देवतांचा धनरक्षक म्हणून कुबेराची नियुक्ती केली होती असा समज आहे. जागेश्वर महादेव मंदिरापासून थोड्या दूर अंतरावर एका छोट्या टेकडीवर कुबेराचे हे मंदिर असून ते चमत्कारी मानले जाते. येथेच शक्तीपंथाची देवी चंदिका हिचेही मंदिर आहे. असे सांगतात, जे भाविक कुबेर मंदिरात पूजा करून येताना एक नाणे बरोबर घेऊन येतात, आणि त्या नाण्याची घरी पूजा करून तिजोरीत अथवा पूजा स्थळी ठेवतात त्यांना कधीच गरिबी येत नाही.

कुबेराचे हे मंदिर रेखा शिखर वास्तुकलेचा उत्तम नमुना असून या मंदिरात एकमुखी दुर्लभ शिवलिंग आहे. हे मंदिर १० व्या शतकात बांधले गेल्याचे उल्लेख येथे आढळतात. कुबेराचे स्थान वटवृक्ष मानले जाते. दिवाळीत धनत्रयोदशी दिवशी कुबेराची पूजा करण्याची प्रथा आहे. प्राचीन काळापासून कुबेर पूजा केली जात आहे.

कुबेराच्या प्रतिमा फार मोठ्या संखेने नाहीत. पण या प्रतिमेची काही वैशिष्ठे आहेत. गोरा रंग, किरीट मुकुट धारण केलेला, विशाल उदर, पिवळी वस्त्रे आणि दागदागिने यांनी सजलेली अशी ही मूर्ती असते. सोने हे सर्वश्रेष्ठ धन मानले गेल्याने कुबेराचे वस्त्र पिवळे असते. त्याच्या हातात रत्न पात्र आणि मुंगुसाचा आकाराची थैली दिसते. त्याला नकुली म्हटले जाते.

Leave a Comment