टेस्टिंग किट बाबत या महिन्यात भारत स्वयंपूर्ण होणार

फोटो साभार नई दुनिया

करोना संक्रमणाची सुरवात झाली तेव्हा टेस्टिंग किट भारतात आयात करावे लागले होते मात्र आता देशात दर महिना ३० लाख किटचे उत्पादन सुरु असून जून मध्ये भारत किट उत्पादनात स्वयंपूर्ण होईल असे केंद्रसरकारच्या बायोटेक्नोलॉजी विभागाचे सचिव डॉ. रेणू स्वरूप यांनी सांगितले. शनिवारी राजस्थान येथे पार पडलेल्या राजस्थान स्ट्राईड व्हर्चुअल कॉनक्लेव मध्ये बोलताना स्वरूप यांनी ही माहिती दिली.

या कॉन्क्लेव्ह मध्ये भारताला विज्ञान तंत्रज्ञानाच्या मदतीने स्वयंपूर्ण कसे बनविता येईल यावर चर्चा झाली. त्यावेळी बोलताना डॉ. स्वरूप म्हणाले, करोना सुरु झाल्यावर पहिल्या १५ दिवसातच करोना ट्रेकिंग आणि टेस्टिंग किट संदर्भात ५०० उपाययोजना मांडल्या गेल्या होत्या. टेस्टिंग किट्स, व्हेंटिलेटर, पीपीई किट्स, मास्क या बाबत स्टार्टअप कंपन्यांनी भारताला स्वयंपूर्ण बनविण्यात मोठे योगदान दिले असून त्यांनी नवीन पद्धतीने ही कामे कशी करता येतील याचा मार्ग दाखविला.

त्यातून आता भारताला जगात उत्पादन हब म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. करोनाची सुरवात झाली तेव्हा भारतात १७ हजार व्हेंटिलेटर होते आणि दोन महिन्यात ही मागणी ७० हजारावर गेली असून अनेक स्टार्टअप चांगल्या दर्जाचे व्हेंटिलेटर, पीपीई किट्स, मास्क बनवू लागले आहेत. सुरवातीला पीपीई किट्स आणि मास्क आयात करावे लागले आज ६०० कंपन्या भारतात याचे उत्पादन करत असून जून मध्ये भारताची या वस्तूंची गरज पूर्ण भागवून जादा उत्पादन होऊ शकेल अशी परिस्थिती आहे.

Leave a Comment