नवी दिल्ली: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनचा पाचवा टप्पा उद्यापासून लागू होत आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या या पाचव्या टप्प्याचे अनलॉक 1 असे नामकरण करण्यात आले आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयावर देशातील काही प्रमुख डॉक्टरांनी टीकेची तोफ डागली आहे. कोरोनाची परिस्थिती सरकारने व्यवस्थित न हाताळल्यामुळे देशात आता कोरोनाचे कम्युनिटी ट्रान्समिशन होणे अटळ असल्याचा इशारा या तज्ज्ञांनी दिला आहे.
केंद्र सरकारवर काही प्रमुख डॉक्टरांचे टीकास्त्र; आता कम्युनिटी ट्रान्समिशन होणे अटळ
सरकारने कोरोनाची संपूर्ण परिस्थिती हाताळताना साथरोग तज्ज्ञ डॉक्टरांच्या मताला किंमत न दिल्यामुळेच भारतातील कोरोनाचे संकट सध्या नियंत्रणात येईल, ही अपेक्षा अवाजवी आहे. उलट समाजातील अनेक स्तरांवर आणि लोकसंख्येत कम्युनिटी ट्रान्समिशन होणे जवळपास निश्चित असल्याचे या डॉक्टरांनी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे. हे पत्रक इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन, इंडियन असोसिएशन ऑफ प्रिव्हेंटिव्ह अँड सोशल मेडिसिन आणि इंडियन असोसिएशन ऑफ एपिडमिलॉजिस्ट या संस्थांनी संयुक्तपणे प्रसिद्ध केले आहे.
मात्र, केंद्र सरकारच्या मते देशात कम्युनिटी ट्रान्समिशन अद्याप झालेले नाही. शनिवारपर्यंत देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १,७३,७६३ एवढी झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने विक्रमी भर पडत आहे. पण अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८९,९८७ वरुन ८६,४२२ वर आल्याचे केंद्राचे म्हणणे आहे.
मात्र, केंद्राचा हा दावा या पत्रकात खोडून काढण्यात आला आहे. २५ मार्च ते ३१ मे या काळात देशात लॉकडाऊन होता. सरकारकडून या काळात अत्यंत कठोर निर्बंध लादण्यात आले होते. पण तरीही या काळात कोरोनाचा वेगाने प्रादुर्भाव झाला. अत्यंत वाईट परिस्थितीचा विचार करुन काही संस्थांचे अनुकरण करत लॉकडाऊनचे हे मॉडेल राबवण्यात आले होते. परंतु, सध्याची परस्थिती पाहता ते पूर्णपणे फसल्याचे दिसत आहे. सरकारने या काळात कोरोनाची अधिक जाण असलेल्या साथरोग तज्ज्ञाचा सल्ला घेतला का? किंबहुना ते अधिक उचित ठरले असते, असे या पत्रकात म्हटले आहे. या पत्रकावर एम्स रुग्णालयाच्या कम्युनिटी मेडिसीन सेंटरचे प्रमुख डॉ. शशी कांत, बीएचयूच्या कम्युनिटी मेडिसीन विभागाचे माजी प्रमुख डॉ. डी.सी.एस रेड्डी यांचा समावेश आहे. हे दोघेही आयसीएमआर रिसर्च ग्रुपचे सदस्य आहेत.