पुण्याच्या भारत फोर्जला नासाच्या कोरोना व्हेंटिलेटर्सचा परवाना


वॉशिंग्टन : कोरोनाग्रस्तांच्या उपचारांसाठी तयार करण्यात आलेले व्हेंटिलेटर्स बनवण्याचा परवाना नासाने पुणे, हैदराबाद व बंगळुरू येथील कंपन्यांना दिला आहे. हे व्हेंटिलेटर्स गंभीर स्वरूपातील कोरोना रुग्णांसाठी वापरले जातात. हा परवाना भारतातील ज्या कंपन्यांना मिळाला त्यात पुण्याच्या भारत फोर्ज लि., बंगळुरूच्या अल्फा डिझाइन टेक्नॉलॉजीज प्रा. लि. आणि हैदराबादची मेधा सव्हरे ड्राइव्हज प्रा.लि यांचा समावेश आहे.

हे परवाने भारतीय कंपन्यांव्यतिरिक्त इतर अठरा कंपन्यांना देण्यात आले असून त्यात आठ अमेरिकी व तीन ब्राझिलियन कंपन्यांचा समावेश आहे. दी नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अँड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (नासा) ही स्वतंत्र संस्था असून ती अवकाश संशोधनाला वाहिलेली आहे.

दक्षिण कॅलिफोर्नियातील जेट प्रॉपल्शन प्रयोगशाळेत नासाने अमेरिकेतील रुग्णांसाठी एक व्हेंटिलेटर तयार केला होता. ‘व्हायटल’ असे तेथील अभियंत्यांनी तयार केलेल्या या व्हेंटिलेटरला म्हटले आहे. तो एक महिन्यात तयार करण्यात आला व त्याला ३० एप्रिल रोजी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिली होती.

व्हायटल म्हणजे व्हेंटिलेटर इंटरव्हेन्शन टेक्नॉलॉजी अ‍ॅक्सेसिबल लोकली नावाचे उपकरण असून त्याचे सुटे भाग पुरवठा साखळ्यात उपलब्ध आहेत. या व्हेंटिलेटरचा गंभीर रुग्णांवर उपचारासाठी वापर केला जातो. लवचिक अशी त्याची रचना असून त्यात सुधारणाही करता येतात. यासंदर्भात माहिती देताना जेपीएल कार्यालयातील लिऑन अल्कालाय यांनी सांगितले, की जगभरात हे तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे अशीच आमची इच्छा आहे. डॉक्टरांशी चर्चा करून हा व्हेंटिलेटर तयार करण्यात आला आहे आणि त्याची चाचणी २३ एप्रिल रोजी घेण्यात आली होती.

Leave a Comment