अनोख्या फेस मास्कची क्रेझ

फोटो साभार नवभारत टाईम्स

मास्क लावावा लागणार मग त्यात थोडी फॅशन असावी अशी अपेक्षा चुकीची नाही. पण मास्क लावल्यामुळे आपली ओळख दुसऱ्यांना चटकन पटावी यासाठीही काहीतरी सोय हवी या कल्पनेतून केरळ मध्ये अनोखे मास्क बनविले जात आहेत. मास्क मुळे अर्धा चेहरा झाकला जात असला तरी मास्क लावलेली व्यक्ती कोण हे त्यामुळे चटकन समजू शकणार आहे.

करोना मुळे लागू झालेला लॉकडाऊन चार फेज पूर्ण झाल्यावर आता हळूहळू शिथिल करण्याची कार्यवाही सुरु झाली असली तरी नागरिकांना घराबाहेर पडताना मास्क वापरणे आणि सोशल डीस्टन्सिंग तसेच अन्य नियम पाळणे आवश्यक असणार आहे. यामुळे मास्कला प्रचंड प्रमाणात मागणी असून त्यांचे मोठे उत्पादन केले जात आहे. त्यात या नव्या प्रकारच्या मास्कची क्रेझ वाढताना दिसून येत आहे. फॅशन म्हणून रंगीबेरंगी मास्क बाजारात येत असतानाच केरळ मध्ये कस्टमाइज्ड मास्क बनविले जात आहेत.

फोटो साभार नवभारत टाईम्स

हे मास्क युजरच्या फेसप्रिंटसह आहेत. म्हणजे मास्क बांधल्यामुळे अर्धा चेहरा दिसला नाही तरी मास्कवर असलेल्या युजरच्या चेहऱ्याच्या प्रिंट मुळे युजर कोण हे समजण्यास सोपे जात आहे. हे मास्क केरळच्या काही फोटो स्टुडीओमध्ये तयार केले जात आहेत. त्यासाठी ग्राहकाने त्याचा फोटो काढायचा किंवा स्टुडीओ कडे पाठवायचा. मग मास्कच्या आकाराच्या हिशोबाने तो एडीट केला जातो आणि चेहऱ्याच्या खालच्या भागाचे डिझाईन तयार केले जाते. कॉटनच्या तयार मास्कवर त्याचे डबल लेयर प्रिंट केले जाते आणि मास्क तयार होतो.

हा मास्क बनविण्यासाठी २० ते २५ मिनिटे लागतात. हे मास्क ६० रुपयांपासून उपलब्ध आहेत. मिळालेल्या माहितीनुसार हा ट्रेंड प्रथम परदेशात सुरु झाला तो आता भारतात आला आहे. यामुळे करोना पासून बचाव आणि लोकांना आपली ओळख लागणे अशी दोन्ही कामे होणार असल्याने त्याला वाढती मागणी आहे.

Leave a Comment