कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र दुसरीकडे असा एक देश आहे जेथे आतापर्यंत कोरोनामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. कोरोनावर यशस्वीरित्या मात केल्याने व्हिएतनामचे जगभरात कौतुक होत आहे. या देशाची लोकसंख्या 9.7 कोटी असून, येथे केवळ 328 रुग्ण आहेत. येथे प्रत्येकी 10 हजार व्यक्तींपैकी 8 डॉक्टर आहेत.
या देशाची 9.7 कोटी लोकसंख्या, कोरोनामुळे अद्याप एकाही व्यक्तीचा मृत्यू नाही

व्हिएतनामची सीमा चीनला लागूनच असल्याने या देशाने सुरूवातीपासूनच कठोर पावले उचलली. व्हिएतनामने तीन आठवड्यांचा लॉकडाऊन केला होता. मात्र एप्रिलमध्ये स्थिती पाहून लॉकडाऊन हटवण्यात आला. येथील शाळा पुन्हा सुरू होत आहेत. कोरोनाचे पहिले प्रकरण समोर आल्यानंतर व्हिएतनामने त्वरित चीनला लागून असलेली आपली सीमा बंद केली होती. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने महामारीची घोषणा देखील केली नव्हती. मात्र या देशाने आधीपासूनच कठोर पावले उचलली.
येथील सरकारने डब्ल्यूएचओच्या दिशानिर्देशांची वाट न पाहता स्वतः लोकांना आरोग्य बाबत जागरूक करण्यास सुरूवात केले. जानेवारीच्या सुरूवातीपासूनच हनोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर वुहानवरून येणाऱ्या लोकांसाठी थर्मल स्क्रिनिंग अनिवार्य केले होते. 23 जानेवारीला पहिला रुग्ण सापडल्यानंतर त्वरित विमानसेवा बंद केली होती. देशातील सर्व चेक पोस्ट, विमानतळ आणि पोर्टवर थर्मल स्क्रिनिंग अनिवार्य केले होते. संक्रमण नियंत्रित करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय संचालन समिती देखील स्थापन केली होती.

1 फेब्रुवारीला व्हिएतनामने कोरोनाला राष्ट्रीय महामारी घोषित केले होते. त्यावेळी येथे केवळ 6 रुग्ण होते. दुसऱ्याच दिवशी चीनी नागरिकांचा व्हिसा निलंबित करण्यात आला. मार्च अखेर सर्वच परदेशी नागरिकांच्या प्रवेशावर बंदी घातली. व्हिएतनामने स्वस्त टेस्ट किट तयार करत कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची चाचणी केली. लोकांना 14 दिवस क्वारंटाईन केले. सोशल मीडिया, पोस्टर्स अशा माध्यमातून लोकांना जागरूक करत या देशाने कोरोनावर मात केली.