लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेले कामगार चालत आपल्या घरी जात आहे. या कामगारांसाठी अनेकजण मदतीचा हात पुढे करत आहे. अभिनेता सोनू सूदने देखील आतापर्यंत हजारो कामगारांसाठी बसची सोय करत त्यांना आपल्या घरी पाठवले आहे. या कामासाठी त्याचे सर्वचजण कौतुक करत आहेत. आता अभिनेते अमिताभ बच्चन हे देखील या कामगारांच्या मदतीसाठी पुढे आले असून, त्यांनी उत्तर प्रदेशच्या 225 कामगारांना घरी जाण्यासाठी 10 बसची सोय केली आहे.
सोनू सूदनंतर कामगारांच्या मदतीसाठी अमिताभ बच्चन आले पुढे, केली बसची सोय

माहिम दर्ग्याचे आयटी डायरेक्टर सबिर सय्यद म्हणाले की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बच्चन साहब कामगारांच्या समस्येविषयी चिंतेत होते. त्यांनी एक प्रस्ताव समोर ठेवला व हाजी आली दर्गा आणि माहिम दर्ग्याने सर्व तयारी केली.

माहिम दर्ग्याचे ट्रस्टी मुद्दसर लांबे यांनी सांगितले की सर्व परवानगी घेण्यात आली आहे. प्रवाशांची तपासणी करण्यात आली असून, त्यांना चपला देखील देण्यात आल्या आहेत. सर्व प्रवाशांना मोफत प्रवासासोबत मास्क, सॅनिटायझर, हातमोजे, पाण्याची बाटली आणि फूड पॅकेज देण्यात आले आहेत. सर्व बसमध्ये इमर्जेंसी सेवेसाठी औषधे, फळांचा ज्यूस, ग्लकोज इत्यादी गोष्टी आहेत.