प्रसिद्ध ज्योतिषी बेजान दारूवाला यांचे निधन

फोटो साभार झी न्यूज

केवळ भारतातच नव्हे तर जगात प्रसिद्ध असलेले ज्योतिषी आणि गणेशभक्त बेजान दारूवाला यांचे शुक्रवारी अहमदाबाद येथे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. २२ मे रोजी त्यांना तब्येत बिघडल्याने अपोलो रुग्णालयात दाखल केले गेले होते. दारूवाला यांचे करोना संसर्गामुळे निधन झाल्याचे सांगितले जात आहे मात्र यांच्या मुलाच्या म्हणण्यानुसार बेजान यांना करोना संसर्ग नव्हता तर त्यांना न्युमोनिया झाला होता आणि त्यांच्या रक्तातील ऑक्सिजन कमी झाला होता. व त्यामुळे त्यांचे निधन झाले.

दारूवाला यांच्या निधनाची बातमी गुजराथचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी सर्वप्रथम ट्विट करून दिली. दारूवाला यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावरही दारूवाला यांच्या निधनाने शोक व्यक्त केला जात आहे. दारूवाला जन्माने पारसी होते मात्र यांची गणेशावर परमभक्ती होती. यामुळे ते भविष्य सांगताना गणेश सेज असे म्हणत असत. त्यांनी आजवर अनेक अचूक भविष्यवाणी केल्या होत्या. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

जन्मपत्रिका, हस्तरेषा आणि टोरोट कार्ड यांचा त्यांचा अभ्यास मोठा होता. ते इंग्रजीचे प्रोफेसर होते. अनेक सेलेब्रिटी, बॉलीवूड तारे तारका त्यांचा सल्ला घेत असत. सलमानच्या बिग बॉस मध्ये ते सामील झाले होते. २००३ साली त्यांनी ज्योतिषी वेबसाईट लाँच केली होती. तत्पूर्वी ते वर्तमानपत्रे आणि टीव्हीवर राशिफल देत असत.

दारूवाला यांनी अनेक भाकिते अचूक वर्तविली होती. पंतप्रधान मोदी २०१४ मध्ये पंतप्रधान होणार, २०१९ मध्ये परत पंतप्रधान होणार, इंदिरा गांधी यांची हत्या, संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू, राजीव गांधी यांची हत्या, भोपाळ गॅस दुर्घटना, मनमोहन सिंग पंतप्रधान होणार, गुजराथ भूकंप अशी अनेक भाकिते त्यांनी अचूक वर्तविली होती. करोना बाबत सुद्धा त्यांनी लवकरच अवघड काळ येणार आहे असे भविष्य वर्तविले होते.

Leave a Comment