लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद स्थलांतरित कामगारांसाठी देवदूत बनून पुढे आला आहे. आतापर्यंत हजारो कामगारांना सोनूने त्यांच्या घरी पाठवले आहे. या कामासाठी त्याचे सोशल मीडियावर भरभरून कौतूक होत आहे. मात्र कामगारांना घरी पोहचवण्यासाठी स्वतःचे लाखो रुपये खर्च करणारा सोनू सूद स्वतः केवळ 5500 रुपये घेऊन मुंबईला आला होता.
फक्त साडे पाच हजार घेऊन मुंबईत आलेल्या सोनू सुदचा असा आहे बॉलिवूडपर्यंतचा प्रवास

त्याने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मॉडेलिंगची सुरूवात दिल्लीमधून केली होती. काही पैसे कमवून मुंबईला जाण्याची त्याची योजना होती. दिल्लीत एक-दीड वर्ष कार्यक्रम केल्यानंतर साडे पाच हजार रुपये जमा केले होते. या पैशात एक महिना तग धरू असे त्याला वाटले होते. मात्र हे पैसे 5-6 दिवसातच संपले. पैशांसाठी घरच्यांची मदत घ्यावी लागेल असे वाटत असतानाच चमत्कार झाला व त्याला पहिले काम मिळाले. एका जाहिरातीसाठी त्याला कॉल आला. या कामासाठी त्याला दररोज 2000 रुपये मिळणार होते. मात्र जेव्हा जाहिरातीसाठी फिल्म सिटीला गेला, तेव्हा सोनूसोबत 10-20 जण अजून उभे होते. या जाहिरातीमध्ये तो मागे कुठेतरी ड्रम वाजवता होता व इतरांना दिसत देखील नव्हता.

सोनू सूदने सांगितले की, जेव्हा मुंबईला आलो होतो तेव्हा लोक त्यांची मदत करतील असे वाटले होते. मात्र कोणताही अभिनेता त्याला भेटायला देखील तयार नव्हता. जे कोणी भेटायचे ते म्हणायचे की, तू अभिनेता बनायला आला आहेस ? तुझ्याकडून होणार नाही परत जा. त्याने सांगितले की, आता जर कोणाला मला भेटण्याची इच्छा असल्यास, माझे जुने दिवस आठवतात. तो सर्वांशी भेटतो व त्यांना प्रोत्साहन देतो.

सोनूने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1999 मध्ये आलेला तामिळ चित्रपट ‘कल्लाझागर’द्वारे केली होती. त्यानंतर त्याने 2001 मध्ये शहीद-ए-आजम चित्रपटात भगत सिंह यांच्या भूमिकेद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. युवा, चंद्रमुखी, आशिक बनाया आपने, जोधा अकबर, सिंह इज किंग, एक विवाह ऐसा भी, दबंग, आर राजकुमार, गब्बर इज बॅक या चित्रपटातील त्याच्या भूमिका गाजल्या.