रिलायन्स इंडस्ट्रीजने तयार केले चीनपेक्षा तीन पट कमी किंमतीत पीपीई किट्स


नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकोपासमोर सर्वच यंत्रणा हतबल होत आहे. पण कोरोनाच्या विरोधातील लढाईत अग्रेसर असलेले कोरोना वॉरिअर्संना पीपीई किट्सची निकडीची गरज भासत आहे. आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने अशा परिस्थितीत पुढाकार घेत चीनपेक्षा तीन पट कमी किंमतीत पीपीई किट्स तयार करण्यास सुरूवात केली आहे. दररोज १ लाख पीपीई किट्स रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सिल्व्हासा येथील प्रकल्पात तयार करण्यात येत आहेत.

कोरोनाचा सामना करण्यासाठी दिवसरात्र झटणाऱ्या डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना, तसंच पोलिसांसह अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी या पीपीई किट्सची आवश्यकता आहे. २ हजार रूपयांपेक्षा जास्त चीनमधून आयात करण्यात येणाऱ्या पीपीई किट्सची किंमत आहे. तर रिलायन्स इंडस्ट्रीजची कंपनी अलोक इंडस्ट्रीजने तयार केलेल्या पीपीई किट्सची किंमत केवळ ६५० रूपये एवढी आहे.

यासंदर्भातील माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजकडून देण्यात आली. कंपनीने आपल्या विविध प्रकल्पांमध्ये दररोज १ लाख पीपीई किट्स तयार करण्यासाठी काम सुरू केले आहे. जामनगर येथील सर्वात मोठ्या रिफायनरीनेदेखील पेट्रोकेमिकल्सचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केले आहे. पीपीई किटचा कपडा याच्याच वापराने तयार करण्यात येतो. अलोक इंडस्ट्रीजमध्ये याच कपड्याचा वापर करून पीपीई किट्स तयार करण्यात येत आहेत. अलोक इंडस्ट्रीजचे काही दिवसांपूर्वीच रिलायन्स इंडस्ट्रीजने अधिग्रहण केले होते. या कंपनीद्वारे सर्व सुविधांचा वापर पीपीई किट्स तयार करण्यासाठी केला जात आहे. तर यामुळे १० हजार जणांना रोजगारदेखील मिळाला आहे.

कोरोनाच्या टेस्टिंग किटमध्येही स्वदेशी तंत्रज्ञानाचा रिलायन्स इंडस्ट्रीजने वापर केला आहे. रिलायन्सने हे स्वदेशी टेस्टिंग किट काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्चच्या मदतीने तयार केले आहे. हे किटदेखील चीनच्या टेस्टिंग किट्सपेक्षा अनेक पटींनी स्वस्त असून ४५ मिनिटे ते एका तासात रुग्णाची संपूर्ण माहिती मिळते.

Leave a Comment