अशी बनवा लज्जतदार फणस बिर्याणी
फोटो साभार यु ट्यूब
लॉकडाऊन मुळे बहुतेक सर्व मार्केट बंद आहेत. त्यामुळे सर्व जनतेला त्याचा त्रास होतोच आहे पण त्यातही नॉनव्हेज रसिकांची निराळीच गोची झाली आहे. करोना साथीमुळे मांसाहार करण्याचे प्रमाण भीतीपोटी कमी झाले आहे आणि त्यामुळे नॉनव्हेजचा आनंद देणाऱ्या फणसाची मागणी प्रचंड वाढली असून फणसाचे दर सुद्धा चिकन पेक्षा जास्त झाले आहेत. फणस हे फळ सुद्धा आहे आणि भाजी सुद्धा. त्यात रेषा भरपूर असतात आणि फणस व्यवस्थित शिजवला तर त्याला नॉनव्हेजची टेस्ट येते. आमच्या वाचकांसाठी खास फणस बिर्याणीची कृती येथे देत आहोत.
फोटो साभार यु ट्यूब
फणस बिर्याणी साठी लागणारे साहित्य
२५० ग्राम फणसाचे मोठे तुकडे, २ कप धुतलेले तांदूळ, १ वाटी दही आणि १०० ग्राम पुदिना, कोथिंबीर, २ मोठे टोमॅटो कापून, तीन मध्यम कांदे उभे चिरून, एक गाजर गोल कापून. मीठ, जिरे पावडर, लाल तिखट.
मसाल्यासाठी शहाजिरे १ चमचा, १ तमालपत्र, १ दालचिनी तुकडा, २ छोटे वेलदोडे, १ मोठा वेलदोडा, एका लिंबाचा रस, १ चमचा धने पावडर, २ चमचे आले लसूण पेस्ट, २-३ हिरव्या मिर्च्या लांब तुकडे करून, १ चक्रीफुल, ४-५ काळे मिरे, तेल, दोन मोठे चमचे साजूक तूप.
फोटो साभार यु ट्यूब
कृती- प्रथम सर्व कोरडा मसला गरम करून बारीक पूड करावी. कोथिंबीर, पुदिना, मिरची वाटून मोठ्या पातेल्यात फणसाचे तुकडे, दही, गरम मसला, वाटलेले वाटण, आले लसूण पेस्ट, मीठ. लिंबू रस, गाजर, टोमॅटो, थोडे तेलं घालून चांगले ढवळावे आणि हे सर्व मिश्रण फ्रीज मध्ये पाच तास ठेवावे. त्यानंतर कुकर मध्ये तेलं तापवून त्यात लांब चिरलेला कांदा चांगला परतावा आणि फ्रीज मधले मिश्रण घालून अवश्य वाटल्यास थोडे पाणी घालून कुकर मध्ये शिजवावे.
कुकर थंड झाला की तांदूळ घालून कुकरमध्येच एकसारखे हलवावे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून पुन्हा एक शिटी द्यावी. बिर्याणी तयार झाल्यावर वरून साजूक तूप सोडावे.