टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शिक्कामोर्तब; वेळापत्रक जाहीर


गेले दोन-अडीच महिने कोरोनाच्या सावटाखाली शांत असलेले क्रिकेट आता पूर्वपदावर येऊ लागले असून विनाप्रेक्षक कॅरेबियन बेटांवर विन्सी प्रिमीयर टी १० लीग स्पर्धा सुरू करण्यात आल्यानंतर अनेक क्रिकेट मालिकांचे वेळापत्रक देखील निश्चित केले जात आहे. याच दरम्यान भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचे वेळापत्रक आयसीसीने जाहीर केले आहे. डिसेंबर महिन्यात भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा नियोजित करण्यात आला असून कसोटी मालिकेला ३ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.


बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका ही ३ डिसेंबरपासून खेळवण्यात येणार असून त्यातील पहिली कसोटी ३ ते ८ डिसेंबर दरम्यान ब्रिसबेन येथे, दुसरा दिवस-रात्र कसोटी सामना ११ ते १५ डिसेंबर दरम्यान अडलेड ओव्हल येथे, तिसरा बॉक्सिंग डे कसोटी सामना २६ ते ३० डिसेंबर दरम्यान मेलबर्न येथे आणि चौथा कसोटी सामना ३ ते ७ जानेवारी दरम्यान सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघ जाणे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा दौरा रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोर उभे राहिलेले आर्थिक संकट अधिक गडद होऊ शकते. बीसीसीआयने याच कारणासाठी ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका खेळण्यास होकार दर्शवला आहे. बुधवारी स्थानिक ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ४ मैदानांची नाव निश्चीत केली होती. त्या नावांवर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Leave a Comment