पतंजलीने सुरु केली कोरोनाच्या उपचारासाठी वैद्यकीय चाचणी


नवी दिल्ली – जगभरातील 213 देशांमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून या जीवघेण्या रोगापुढे सर्वच देश हतबल झाले आहेत. त्यातच अनेक देशांतील वैज्ञानिकांनी या रोगाचा बिमोड करण्यासाठी संशोधन सुरु केले आहे. त्याचबरोबर याची प्रतिबंधक लसीची काही देशात चाचणी सुरु आहे. अशातच योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजलीने कोरोनाच्या उपचारासाठी वैद्यकीय चाचणी सुरू केल्याची माहिती दिली आहे. पतंजलीने ही चाचणी नियामक मंडळाची मान्यता मिळाल्यानंतर सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

केवळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याबद्दल आम्ही बोलत नाही. कोरोनाच्या उपचाराबद्दल आम्ही सांगत आहोत. नियामक मंडळाची गेल्या आठवड्यात मान्यता मिळाल्यानंतर इंदूर आणि जयपूरमध्ये कंपनीने कोरोनाच्या वैद्यकीय चाचण्या सुरू केल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी दिली. यासंदर्भातील वृत्त मनी कंट्रोलने दिले आहे.

सध्या केवळ मोठ्या कंपन्यांची कोरोनाच्या चाचण्यांदरम्यान नावे समोर येत होती. गिलियड सायंसेज, फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना, इनोव्हियो फार्मा आणि ग्लॅक्सो स्मिथक्लाइन या कपंन्या यामध्ये पुढे असल्याचे म्हटले जात होते. पण आता पतंजलीचेदेखील नाव यात जोडले गेले आहे. पतंजलीचे नाव या यादीत जोडले जाणे ही बाब कंपनीसाठी मोठी असल्याचे म्हटले जात आहे.

पंतजली समुहाने फेब्रुवारी महिन्यापासूनच कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू केले होते. पतंजलीने मार्च महिन्यापर्यंत अनेकांवर उपचार केले. पण ते वैद्यकीय चाचणीचा भाग नव्हते. उपचाराच्या रुपात आमच्या संशोधनाला आणण्यासाठी त्याची वैद्यकीय चाचणी होणे आवश्यक आहे. याकडेच पाहता नियामक मंडळाची मान्यता घेतल्यानंतर याची वैद्यकीय चाचणी सुरू करण्यात आल्याचे बालकृष्ण म्हणाले.

आमच्यासाठी वैद्यकीय चाचणीची परवानगी मिळवणे म्हणावे तेवढे सोपे नव्हते. हे पुढे नेण्यास इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चनेदेखील रस दाखवला नाही. म्हणून क्लिनिकल ट्रायल्स रेग्युलेटर ऑफ इंडियाकडे पतंजली समुहाने नोंदणी करण्याचा निर्णय घेतला आणि जयपूर विद्यापीठाअंतर्गत एका विभागात वैद्यकीय चाचण्यांना सुरूवात केल्याचे बालकृष्ण यांनी सांगितले. आमची कोणत्याही आयुर्वेदीक कंपनी किंवा संस्थेत असलेल्या सुविधांशी तुलना करा. त्यात आमच्या प्रयोगशाळाच या उत्तम आहेत. सध्या ५०० संशोधक आमच्याकडे आहेत आणि त्यापैकी कमीतकमी १०० हे पोस्ट डॉक्टरेट संशोधक असल्याची माहितीही त्यांनी दिली.

योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदचे टर्नओव्हर २०१९ मध्ये ८ हजार ५०० कोटी रूपये होते. तसेच ५० हजार कर्मचारी या कंपनीत काम करत होते. ब्रोकरेज हाऊस सीएलएसए आणि एचएसबीसीनुसार पतंजली ही भारतातील तेजीने वाढणारी एफएमजीसी आहे. त्यातच आता कंपनीने कोरोनाच्या उपचारात वैद्यकीय चाचण्या सुरू करणे हे टाकलेले मोठे पाऊल असल्याचेही म्हटले जात आहे.

Leave a Comment