वेळेवर केरळात दाखल होणार मान्सून


नवी दिल्ली – उन्हामुळे देशातील राज्यांचे वाढते तापमान आणि त्यामुळे होणाऱ्या लाहीलाहीमुळे सर्वचजण हैराण झाले आहेत. त्यामुळे आता देशातील सर्वांनाच मान्सून कधी दाखल होणार याची प्रतिक्षा लागून राहिली होती. त्यातच आता मान्सूच्या पुढील प्रगतीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे यंदा मान्सूनचा पाऊस एक जून पर्यंत केरळात दाखल होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

३१ मे पर्यंत दक्षिण पूर्व आणि मध्य पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर एक जून पर्यंत मान्सून ठरलेल्या वेळेला केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वसाधारणपणे केरळमधून मान्सूनची सुरुवात होते. केरळमध्ये एक जूनला मान्सून दाखल झाला नाही तर उर्वरीत भारतातही मान्सूनच्या वेळापत्रकात बदल होतो.

मान्सून सध्या अंदमानचा समुद्र, अंदमान-निकोबार बेट, बंगालचा उपसागराचा भाग आणि मालदीवच्या कोमोरीनपर्यंत पोहोचला आहे. मालदीवचे आणखी काही भाग पुढच्या ४८ तासात मान्सून व्यापेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. कमी दाबाचा पट्टा पश्चिम मध्य अरबी समुद्रात तयार झाला आहे. वादळाची शक्यता असल्यामुळे केरळमध्ये मच्छीमारांना रात्रीपर्यंत किनाऱ्यावर पोहोचण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्यांना शक्य नाही, त्यांना जवळचा किनारा गाठण्यास सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने याआधी सहा जूनपर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होईल असे म्हटले होते.

Leave a Comment