महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच खांदेपालट होण्याची शक्यता


मुंबई : राज्यावर कोरोनाचे भयाण संकट ओढावलेले असतानाच राज्यातील राजकीय क्षेत्रात वेगळीच खलबते होऊ लागली आहे. त्यातच आता महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विधानसभा अध्यक्षपदाऐवजी नाना पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदी तर विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाणांना आणण्याच्या हालचाली सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या बदलाची जोरदार चर्चा काँग्रेस वर्तुळात देखील सुरु झाली आहे. नाना पटोले हे मागील दोन दिवसांपासून दिल्लीत असून हेच कारण त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागेही असल्याचे कळते.

अजून वर्षही विधानसभा अध्यक्ष निवडीला पूर्ण झालेले नाही. मग अचानक हा बदल कशासाठी हा प्रश्न साहजिकच उपस्थित होत आहे. पण अनेक सबळ कारणे काँग्रेसमध्ये या बदलासाठीची सांगितली जात असल्यामुळे लवकरच मोठे बदल होण्याची शक्यता आहे. सध्या राज्य मंत्रिमंडळात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूलमंत्री पदाची जवाबदारी त्यांच्याकडे आहे. त्याचबरोबर काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच असल्यामुळे त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून त्यांना मुक्त केले जाऊ शकते.

नाना पटोले यांची आक्रमक नेते म्हणून ओळख आहे. त्याचबरोबर काँग्रेस ज्या विदर्भात भाजपला टक्कर देऊ पाहत आहे, त्याच विदर्भातील ते नेते आहेत. तसेच ते ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. ते मूळचे काँग्रेसचे, पण 2014मध्ये ते भाजपच्या तिकीटावर खासदार झाले. त्याचबरोबर नाना पटोले भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणारे देशातील पहिले खासदार ठरले होते.

दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे नाना पटोलेंच्या ऐवजी विधानसभा अध्यक्षपद दिले जाऊ शकते. पृथ्वीराज चव्हाण यांना मागच्या वेळीसुद्धा विधानसभा अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती. पण ती त्यांनी न स्वीकारल्यामुळे आता ही ऑफर ते स्वीकारतात का हे आगामी काळातच स्पष्ट होईल.

नाना पटोले यांना कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत असल्याबाबत विचारले असता ते म्हणाले होते की, जी जबाबदारी पक्ष देईल ती जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे आणि जी जबाबदारी मिळेल ती पार पाडण्याचा नक्की प्रयत्न करेल. अधूनमधून महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये काँग्रेस कमजोर पडत असल्याची चर्चा सुरु होते. भविष्यातील पक्षाला निवडणुकांचाही विचार करायचा आहे. त्याच अनुषंगाने या बदलाची आता चर्चा जोरात सुरु आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक करावी लागणार असली तरी सध्याच्या एकजुटीच्या स्थितीत तीही गोष्ट अवघड नसल्याचे काँग्रेस नेते सांगत असल्यामुळे काँग्रेसच्या या खांदेपालटाला कधी हिरवा कंदिल मिळतो हे पाहणे औत्सुक्याचे असेल.

Leave a Comment