त्या विवादग्रस्त जाहिरातीवरून ‘केंट’ने मागितली माफी

घरगुती उपयोगाच्या वस्तू उत्पादन करणारी कंपनी केंट आरओला आपल्या एका जाहिरातीसाठी सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागत आहे. केंट आरओच्या कणीक मळण्याच्या मशीनच्या नवीन जाहिरातीमध्ये घरकाम करणाऱ्यांचे हात कदाचित संक्रमित असू शकतात, त्यामुळे त्यांना कणीक मळायला देऊ नये, असे म्हटले आहे. मात्र सोशल मीडियावर टीकेची झोड उठल्यानंतर कंपनीने ही जाहिरात मागे घेतली असून, या संदर्भात माफी मागितली आहे.

या जाहिरातीमध्ये लिहिण्यात आले होते की, तुम्ही तुमच्या घरी काम करणाऱ्या महिलेला हाताने कणीक मळू द्याल का ? कदाचित त्यांचे हात संक्रमित असतील. त्यामुळे हातांचा वापर न करता कणीक आणि ब्रेडसाठी केंटची मशीन निवडा.

सोशल मीडियावर या जाहिरातीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी याला वर्गभेदी म्हटले आहे. तसेच काहींनी कंपनीला बॉयकॉट करण्याची देखील मागणी केली.

कंपनीचे चेअरमन महेश गुप्ता म्हणाले की, आमची केंट आटा आणि ब्रेड मेकरची जाहिरात हेतूपरस्पर नव्हती. चुकीच्या पद्धतीने कम्यूनिकेट झाली व ती चुकीची होती. जाहिरात त्वरित हटवण्यात आली असून, आम्ही सर्वांची माफी मागतो.

Leave a Comment