हिमाचल भाजप अध्यक्षांचा पीपीई कीट घोटाळ्याप्रकरणी राजीनामा


शिमला : देशावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटादरम्यान हिमाचल प्रदेशमध्ये पीपीई किटचा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. हिमाचल प्रदेश भाजप अध्यक्ष राजीव बिंदल यांनी या प्रकरणी राजीनामा दिला आहे. काँग्रेसने पीपीई किट घोटाळ्यात त्यांचा हात असल्याचा आरोप केल्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी अत्यंत महत्वाचे असलेल्या या पीपीई किट खरेदीसंबंधी अधिकाऱ्याच्या संभाषणाची कथित ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यामुळे पीपीई किटच्या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले होते.

43 सेकंदाची या प्रकरणात एक ऑडीओ क्लिप समोर आली होती. आरोग्य संचालक डॉ. अजयकुमार गुप्ता हे त्यात पीपीई पुरवठादाराकडे 5 लाख रुपयांची लाच मागत असल्याचे समोर आले होते. गुप्ता या प्रकरणी अटकेत आहेत. यात बिंदल यांचाही सहभाग असल्याचा आणि बिंदल यांनीच टेंडर दिल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. त्यामुळे बिंदल यांनी आज राजीनामा दिला.

करोडो रुपयांच्या देवाण-घेवाणीचा उल्लेख या क्लिपमध्ये करण्यात आला आहे. भाजप नेत्यांची नावे या प्रकरणात घेतली जात असल्यामुळे राजीव बिंदल यांनी नड्डा यांना पाठविलेल्या राजीनाम्यामध्ये याचे कारण दिले आहे. कथित ऑडीओ क्लीप गेल्या काही दिवसांपासून व्हायरल होत आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश सरकारने त्याविरोधात कारवाई केली आहे. गुन्हा दाखल करून त्या अधिकाऱ्याला अटकही करण्यात आली आहे.

काही लोक या प्रकरणात भाजपकडे बोट दाखवत असल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष या नात्याने या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करता यावी यासाठी नैतिकतेमुळे मी राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. साडेचार महिन्यांपूर्वीच बिंदल यांची भाजप अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

कोरोना व्हायरसच्या या महामारीत हिमाचल प्रदेशच्या आरोग्य विभागात झालेल्या या भ्रष्टाचाराच्या पापातून भाजप सुटू शकत नाही, असे हिमाचल प्रदेश कांग्रेस अध्यक्ष कुलदीप सिंह राठौर आणि विधिमंडळ गटनेते मुकेश अग्निहोत्री यांनी म्हटले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री जयराम ठाकूर देखील जबाबदार आहेत. कारण आरोग्य विभागाचा अतिरिक्त कारभार त्यांच्याकडे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment