पुढील 6 महिने सरकारने गरीबांच्या खात्यात 7,500 रुपये जमा करावे – सोनिया गांधी

कोरोना व्हायरसमुळे करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे स्थलांतरित मजूरांपासून ते उद्योगांना देखील फटका बसला आहे. या पार्श्वभुमीवर आता काँग्रेस पक्षाने ‘स्पीक अप इंडिया’ अभियान सुरू केले आहे. तसेच काँग्रेसने गरीबांसाठी सरकारने खजिना उघडावा असे म्हटले आहे.

सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी म्हणाल्या की, लॉकडाऊनमुळे असंख्य नोकऱ्या गेल्या आहेत, व्यवसाय बंद आहेत. शेतकरी स्वतःचे धान्य विकू शकत नाही. मात्र अशा स्थितीतही सरकार याची जबाबदारी घेताना दिसत नाही. समस्या कमी करण्यासाठी सरकारने स्थलांतरित कामगार, गरीब कुटुंबांच्या खात्यात थेट पैसे जमा करावे व एमएसएमईएससाठी मदत पॅकेज जाहीर करावे.

सोनिया गांधी म्हणाल्या की, सरकारने पुढील 6 महिने प्रत्येक कुटुंबाच्या खात्यात 7,500 रुपये थेट जमा करावे व त्यातील 10 हजार रुपये त्वरित देण्यात यावेत. प्रवाशांची घरी सुरक्षित व मोफत जाण्यासाठी सोय करावी व मनरेगाच्या कामाचे दिवस वाढवून 200 करण्यात यावेत. कर्ज देण्याऐवजी लघू व मध्यम उद्योगांना मदत पॅकेज जाहीर करावे, जेणेकरून कोट्यावधी नोकऱ्या वाचतील.

Image Credited – India TV

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा म्हणाल्या की, आम्ही मागील दीड महिन्यात 90 लाख लोकांना मदत केली. या संकटाच्या काळात अडकलेल्या लोकांसाठी सोशल मीडियावर लोकांनी आवाज उठवण्याचे आवाहन करतो.

Leave a Comment