जगातला हा आहे महागडा आंबा

फोटो साभार द टेलेग्राफ

आंबा आवडत नाही अशी व्यक्ती शोधून सापडणे अवघड. उन्हाळ्याचा सारा ताप आंब्यामुळे सुसह्य होत असतो असे म्हटले तरी फार चुकीचे ठरणार नाही. आंबा जगाच्या विविध भागात पिकतो आणि त्यांच्या किमतीही वेगवेगळया असतात. भारतात हापूस सर्वात महाग मानला जातो तर दशेरा, केशर, लंगडा, तोतापुरी अश्या अनेक जातीचे आंबे सहज परवडणाऱ्या किमतीत मिळतात. पण जगाचा विचार करायचा तर जगातील सर्वात महागडा आंबा जपान मध्ये पिकतो.

ताईयो नो तामागो म्हणजे (सूर्याचे अंडे) असे नाव असलेला हा खरा फळांचा राजा. जपानच्या मिजायाकी प्रांतात दरवर्षी सर्वप्रथम पिकलेल्या आंब्याची बोली लावली जाते. आपल्याकडेही हापूसच्या पहिल्या पेटीचा भाव काय फुटला याची उत्सुकता आंबा रसिकांना असते तोच हा प्रकार. यंदा जपानच्या या लिलावात या आंब्याच्या जोडीला म्हणजे दोन आंब्याना चक्क ३६०० डॉलर्स म्हणजे २ लाख ७२ हजार रुपये भाव मिळाला. हे दोन आंबे प्रत्येकी ३५० ग्राम वजनाचे होते. म्हणजे या आंब्याचा किलोचा भाव ३ लाख रुपयांवर होता.

फोटो साभार टेलेग्राफ

या आंब्याचे पिक उन्हाळा आणि थंडी अश्या दोन्ही वेळी घेतले जाते आणि विशेष म्हणजे ऑर्डर नुसार त्याचे उत्पादन केले जाते. खूप काळजीपूर्वक देखभाल केली जाते. शेतकरी प्रत्येक आंब्याला छोटे जाळे अश्या प्रकारे बांधतात की आंब्याला सर्व बाजूनी उन मिळेल. जाळीमुळे आंबा पिकला तरी झाडावरून खाली पडत नाही. स्वादिष्ट, रसाळ असा हा आंबा अर्धा लाल आणि अर्धा पिवळ्या रंगाचा असतो.

Leave a Comment