उद्योग हे सुद्धा करिअर आहे

business
दहावी किंवा बारावीचे निकाल लागले की, गुणवत्ता याद्या प्रसिद्ध व्हायला लागतात आणि गुणवान विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी पत्रकारांची घाई सुरू होते. या हुशार अभ्यासू मुलांना पत्रकारांकडून काही ठराविक प्रश्‍ने विचारले जातात. त्यामध्ये अभ्यास कसा केला? पेपर कसा सोडवला आणि पुढे काय करणार हे प्रश्‍न हमखास विचारले जात असतात. या हुशार मुलांकडून त्याची उत्तरे सुद्धा ठराविक पद्धतीनेच दिली जातात. यातली बहुतेक मुले डॉक्टर, इंजिनिअर होऊ इच्छित असतात. पत्रकारांनी असा प्रश्‍न विचारल्यावर आपण डॉक्टर होणार, आपण इंजिनिअर होणार अशी उत्तरे द्यावीत असे त्यांना पालकांनी सांगून ठेवलेले असतात आणि त्या मुलांच्या मनात सुद्धा डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे वेड त्यांच्या पालकांनी पेरलेले असते. खरे म्हणजे हा समाज केवळ डॉक्टर आणि इंजिनिअर यांच्यामुळे चाललेले नाही. हे या समाजातले दोन मोठे प्रतिष्ठित व्यवसाय आहेत ही गोष्ट खरीच आहे. परंतु समाजाच्या संचालनासाठी इतरही अनेक व्यवसायांची गरज आहे. निरनिराळ्या सरकारी खात्यातले प्रशासकीय अधिकारी, बँकांचे अधिकारी, पत्रकार, शेतकरी, व्यापारी, कारखानदार, शास्त्रज्ञ, पायलट इत्यादी अनेक व्यवसाय समाजामध्ये प्रतिष्ठेचेच आहेत. त्यांना पैसाही चांगला मिळतो, परंतु आपल्या देशामध्ये डॉक्टर, इंजिनिअर होण्याचे वेड एवढे बळावले आहे की, या सगळ्या महत्वाच्या व्यवसायाकडे सर्वांचेच आणि त्यातल्या त्यात हुशार विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होत आहे.

या सगळ्या व्यवसायाकडे करिअर म्हणून पहायला कोणी तयार नाही. पण चांगला व्यापारी, चांगला कारखानदार, चांगला पत्रकार, चांगला शेतकरी हे सुद्धा करिअरचे विषय आहेत हे विसरता येत नाही. किंबहुना आणि डॉक्टर आणि इंजिनिअरपेक्षाही शेतकरी आणि उद्योजक हे जास्त महत्वाचे घटक आहेत. भारतातले लोक शेतीकडे केवळ उपेक्षेनेच पाहतात असे नाही तर शेतकरी होणे म्हणजे आयुष्याची बरबादी अशी लोकांची कल्पना आहे. तेव्हा लाखातच काय पण कोटीत एखादा विद्यार्थी सुद्धा आपण शेतकरी म्हणून करिअर करणार असे चुकून सुद्धा बोलत नाही. अशा प्रकारे ज्याकडे करिअर म्हणून बिल्कुल पाहिले जात नाही असे एक क्षेत्र म्हणजे उद्योजकता. उद्योजक होणे हे करिअर आहे ही कल्पना जर कोणासमोर मांडली तर एक तर ती हास्यास्पद तरी वाटेल किंवा क्रांतीकारक तरी वाटेल. कित्येकांना उद्योजक म्हणजे काय हे माहीत सुद्धा नसते. त्यांच्यादृष्टीने उद्योजक म्हणजे दुकानदार.

दुकानदाराचे एक चित्र आपल्या डोळ्यासमोर कायम उभे असते, ते म्हणजे कळकट कपडे घालून दुकानात बसलेला माणूस. शक्यतो एकाच जागी बसून व्यवसाय करत असल्यामुळे त्याचे शरीर सुटलेले असते आणि तो बेढब दिसत असतो. तेव्हा अशा प्रकारचा दुकानदार होणे हे करिअर तर होऊ शकतच नाही, पण तो करिअर नावाच्या शब्दावर डाग आहे असे मानले जाते. परंतु उद्योजक म्हणजे दुकानदार नव्हे हे समजून सांगण्याची गरज आहे. कोणताही व्यवसाय तीन प्रकारात मोडत असतो. एक म्हणजे कारखानदारी, दुसरा प्रकार म्हणजे दुकानदारी आणि तिसरा प्रकार म्हणजे सेवा उद्योग. या तिन्ही प्रकारांना एकंदरीत व्यवसाय म्हटले जाते आणि व्यवसाय हे कोणी शिकून करावे असे होऊ शकत नाही अशी मान्यता आहे. काही विशिष्ट जाती व्यवसाय करत असतात. विशेषत: मारवाडी समाज हा व्यवसाय करणारा, व्यापार करणारा वर्ग म्हणून ओळखला जातो आणि या जातीमध्ये जन्म घेणारा मुलगा आपल्या वडिलांप्रमाणेच कोणत्या तरी धंद्यातच उतरणार हे ठरलेलेच असते. वंशपरंपरेने ही मुले हे व्यवसाय करत राहतात, त्याला घरातच या व्यवसायाच्या सार्‍या युक्त्या माहीत झालेल्या असतात. त्यामुळे इतर जातींच्या मुलांनी किंवा मुलींनी धंदा, व्यवसाय, उद्योजकता या भानगडीत पडण्याचे कारणच नाही असे आपण ठरवून टाकलेले आहे. जे परंपरेने व्यापार करतात त्यांच्याकडे भरपूर भांडवल असते आणि त्या भांडवलाच्या जोरावर ते व्यवसाय करत राहतात. आपल्याकडे तसे भांडवल नसते त्यामुळे आपण व्यवसाय करण्याचा प्रश्‍नच येत नाही असा निर्णय आपण घेतलेला असतो.

त्या लोकांनी व्यवसाय करावा आणि आपण त्यांच्या व्यवसायामध्ये नोकरी करावी अशी चाकरमानी वृत्ती मराठी भाषिकांमध्ये निर्माण झालेली आहे. वास्तविकत: चारमान्या वृत्तीमध्ये दर महिन्याला ठराविक तारखेला पगार मिळतो आणि त्या पगाराचे सुख चाकरमान्यांना हवेहवेसे वाटत असते. आपण ज्याच्याकडे नोकरी करतो त्याचा धंदा बुडला तरी आपण दुसरीकडे नोकरी करून ठराविक तारखेला पगार मिळण्याचे सुख मिळवू शकतो. पण धंदा करण्यामध्ये सतत तोट्यात येण्याची भीती असते. त्यामुळे ते तोट्यात येण्याचे टेन्शन आपल्याला नकोच, आपण आपली नोकरी केलेली बरी. म्हणून आपण उद्योजक होण्याचा करिअर म्हणून असलेला पर्याय पूर्णपणे बाद करून टाकलेला असतो. परिणामी आपण परंपरेने नोकर्‍याच करीत आलो आहोत आणि मराठी भाषिकांमध्ये नोकरीलाच प्रतिष्ठा आहे. या कल्पना बदलून कधी तरी उद्योजकता हा एक करिअरचा पर्याय म्हणून विचारात घेण्याची गरज आहे.

Leave a Comment