टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसीची महत्वपूर्ण माहिती


नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियात खेळवली जाणारी टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात येणार असल्याच्या चर्चा सध्या विविध माध्यमांमध्ये रंगत आहेत. याबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) अधिकृत घोषणा करण्याची शक्यता असून ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान आयपीएल २०२०चे आयोजन केले जाईल. त्याचबरोबर भारतात २०२१चा टी-२० विश्वचषक खेळवण्यात येत असल्याने २०२२ मध्ये २०२० चा विश्वचषक घेण्यात येईल अशा देखील चर्चांनाही ऊत आला आहे. पण या साऱ्या चर्चांवर आयसीसीच्या प्रवक्त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या वर्षाच्या अखेरीस खेळवल्या जाणाऱ्या टी २० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तारखा लांबणीवर टाकण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सर्व प्रकारची तयारी नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच केली जात आहे. उद्या (२८ मे) होणाऱ्या बैठकीत या स्पर्धेबाबतचा मुद्दा चर्चेसाठी उपस्थित करण्यात येणार आहे. त्यावर व्यवस्थित चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्टीकरण आयसीसीचे प्रवक्ते यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिले आहे.


यावर्षा अखेरीस ऑस्ट्रेलियामध्ये खेळवल्या जाणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धेवर कोरोनाचे सावट आहे. टी २० विश्वचषक स्पर्धा कोरोनाच्या तडाख्यामुळे लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. नुकतीच आयसीसीच्या क्रिकेट समितीची एक महत्त्वाची बैठक पार पडली. टी २० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनावरदेखील त्यात चर्चा झाली. त्यानुसार नियोजित ओक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत टी २० विश्वचषक हा खेळवणे शक्य नसल्याचे सांगण्यात आल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले होते. पण आज (२८ मे) या संबंधी पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. त्या बैठकीत चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असे आयसीसीच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आले आहे.

Leave a Comment