काँग्रेसशासित राज्यात देखील राहुल गांधींचे कुणीही ऐकत नाही


नवी दिल्ली – काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात केंद्र सरकार अयशस्वी ठरल्याचा आरोप केला होता. रविशंकर यांनी यावरुनच राहुल यांच्यावर टीकास्त्र सोडताना राहुल गांधी हे सपशेट खोटे बोलत असल्याचा आरोप केला आहे. जेव्हापासून देशावर कोरोनाचे भयाण संकट ओढावले आहे तेव्हापासून या लढाईमध्ये राहुल गांधी देशातील नागरिकांचा संकल्प तोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याबाबत ते सपशेल खोटे बोलून चुकीची वक्तव्ये करत आहेत. त्याचबरोबर राहुल गांधी लोकांसमोर आकडे आणि माहितीमध्ये फेरफार करुन मांडत असल्याचे रविशंकर म्हणाले आहेत.

कशाचाही विचार न करता राहुल गांधी बोलतात. विषयाचा नीट अभ्यास त्यांनी केलेला नसतो. ते स्थलांतरित मजुरांच्या मुद्द्यावर केवळ राजकारण करत आहेत. त्याचबरोबर काँग्रेसशासित राज्यांमध्ये देखील राहुल गांधीचे कुणी ऐकत नाही. भिलवाडा कोरोनामुक्तीच्या मॉडेलचे श्रेय सोनिया गांधी यांनी राहुल गांधींना दिले होते. पण हे सर्व लोकांच्या सहकार्यामुळे शक्य झाल्याचे तेथील सरपंचांनीच नंतर स्पष्ट केले होते. त्यांनी आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने कोरोनाच्या लढाईमध्ये त्यांचा मतदारसंघ असलेल्या वायनाडला मोठे यश मिळाल्याचा दावा केला होता. पण सत्य परिस्थिती ही आहे की वायनाड केरळमधील कोरोना हॉटस्पॉट झाला होता, असा टोला रविशंकर यांनी राहुल यांच्यावर टीका करताना लगावला आहे.

त्याचबरोबर राहुल गांधी हे महाराष्ट्र सरकारच्या अपयशापासून दूर पळत आहेत. तसेच ते महाराष्ट्रासंदर्भातील निर्णयांमध्ये आम्ही सहभागी नसल्याचे सांगतात. याचाच अर्थ ते महाराष्ट्र सरकारच्या अपयशापासून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला त्यांनी सल्ला देण्यापेक्षा आधी स्वत:ची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील काम पहावे, असा सल्ला रविशंकर यांनी राहुल यांना दिला आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवे लावण्यासंदर्भात केलेल्या आवाहनाचीही खिल्ली उडवली होती अशी आठवणही रविशंकर प्रसाद यांनी करुन दिली. दिवा लावण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते, तेव्हा राहुल यांनी त्याचीही खिल्ली उडवत देशाची एकात्मता तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. तसेच मजुरांबद्दल ट्विट करुन त्यांनी नाटकही केल्याचे रविशंकर प्रसाद राहुल यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले.

Leave a Comment