कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जास्तीत जास्त टेस्टिंग करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईत टेस्टिंग ऑन व्हिल्स म्हणजे कोव्हिड टेस्टिंग बसची सुरूवात करण्यात आली आहे. जावा मोटारसायकलचे उत्पादक आणि पुण्यातील कृष्णा डायग्नोस्टिक फर्म्सने महाराष्ट्रातील कोरोना टेस्टिंग वाढविण्यासाठी ही कोरोना टेस्टिंग बस तयार केली आहे. आयआयटी एल्युमनी काउंसिल, मुंबई महानगरपालिका आणि कृष्णा डायग्नोस्टिक्स यांचा हा एकत्र येऊन कोरोना टेस्टिंग वाढविण्यासाठीचा प्रयत्न आहे.
मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली जगातील पहिली ‘टेस्टिंग ऑन व्हिल्स’ बस
ही बस शहरातील विविध भागात जाऊन कोरोना संशयित व्यक्तीचे टेस्टिंग करेल. बसमध्ये त्वरित जेनेटिक टेस्टिंग, आर्टिफिशियल इंटेलिजेंसवर आधारित टेलेरेडिओलॉजी आणि कॉन्टॅक्टलेस आरटी-पीसीआर स्वॅब कलेक्शन केले जाते. या बसमुळे टेस्टिंगचा खर्च 80 टक्क्यांनी कमी होईल व पुढील 100 दिवसांमध्ये टेस्टिंगच्या संख्येत 100 पटींनी वाढ होईल. सध्या बस तासाला 10 ते 15 टेस्ट नमुने घेते व प्रत्येकानंतर बसची सफाई केली जाते.
ज्या भागात अधिक लोकसंख्या आहे अशा ठिकाणी मास स्क्रिनिंग आणि रॅपिड टेस्टिंगसाठी ही बस उपयोगी ठरते. जगातील अशाप्रकारची ही पहिलीच बस असून, आगामी पावसाळी हंगाम लक्षात घेऊन याचे डिझाईन करण्यात आले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात बसचा उपयोग पोलिस दल, स्वच्छता कामगार आणि अत्यावश्यक सेवा देणार्या लोकांच्या टेस्टिंगसाठी केला जात आहे.