आता व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून करता येणार गॅस सिलेंडर बुक


नवी दिल्ली : देशभरातील आपल्या गॅस सिलेंडर ग्राहकांसाठी भारत पेट्रोलियमने (BPCL) नवी सुविधा सुरु केली आहे. त्यांच्या नव्या सुविधेनुसार आता ग्राहकांना व्हॉट्सअॅपच्या माध्यमातूनही गॅस सिलेंडर बुक करता येणार आहे. व्हॉट्सअॅपवरुन गॅस सिलेंडर बुक करण्याची सुविधा भारत पेट्रोलियमने संपूर्ण देशात सुरु केली आहे.

देशभरात भारत पेट्रोलियमचे 71 लाखांहून अधिक ग्राहक आहेत. भारत पेट्रोलियम गॅस वितरणाच्या बाबतीत इंडियन ऑईलनंतर दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे. भारत गॅस नावाने भारत पेट्रोलियमचा घरगुती गॅस सिलेंडर वितरणाचा व्यवसाय आहे. आपल्या ग्राहकांसाठी, गॅस सिलेंडर बुकिंगसाठी कंपनीने व्हॉट्सअॅप सेवा सुरु केली आहे.

याबाबत भारत गॅसने दिलेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलेंडर ग्राहकांना व्हॉट्सअॅप क्रमांक 1800224344 वर आपला गॅस सिलेंडर बुक करता येऊ शकतो. ग्राहकाचा गॅस एजेन्सीमध्ये जो फोन नंबर रजिस्टर्ट आहे त्याच फोन नंबरवरुन, व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून गॅस बुक करता येऊ शकतो.

कंपनीचे विपणन संचालक अर्थात मार्केटिंग डायरेक्टर अरुण सिंह यांनी गॅस बुकिंगसाठी व्हॉट्सअप नंबर लॉन्च करताना सांगितले की, व्हॉट्सअॅपच्या सुविधेमुळे ग्राहकांना गॅस सिलेंडर बुक करणे अधिक सोपे होईल. व्हॉट्सअॅपचा सर्वाधिक वापर होत असल्याने, अनेकांना याच्या वापराबाबत माहित असल्याचेही ते म्हणाले.

व्हॉट्सअॅपवर सिलेंडर बुक केल्यानंतर ग्राहकाला फोन नंबरवर एक बुकिंग मेसेज येईल. त्या मेसेजमध्ये बुकिंग संख्या असेल. या मेसेजमध्ये गॅस सिलेंडरचे ऑनलाईन पेमेंट करण्यासाठीचीही एक लिंक असेल. या लिंकवर ग्राहक डेबिट, क्रेडिट, यूपीआय आणि इतर ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्मवरुनही सिलेंडरची रक्कम भरु शकतात.

Leave a Comment