महाराष्ट्र पोलिसांच्या ट्विटला आयुषमानचे मराठीत उत्तर


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सध्या देशव्यापी लॉकडाऊन सुरु असून याच काळात स्थानिक प्रशासनाकडून वारंवार घरात राहण्याचे, अनावश्यक कारणांसाठी बाहेर न फिरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. पण काही शहाणी माणसे या नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसत असल्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करत आहेत. त्यासाठी त्यांच्याकडून बऱ्याच वेळा ते हटके पद्धतीचा देखील वापर केला जातो. महाराष्ट्र पोलिसांनी अलिकडेच ‘गुलाबो सिताबो’ या आगामी चित्रपटाच्या टॅगलाइनचा अनोख्या पद्धतीने वापर करत नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहन केले होते. अभिनेता आयुषमान खुरानानेदेखील पोलिसांचे हे ट्विट पाहिल्यानंतर मराठीमध्ये ट्विट करत नागरिकांना घरी थांबण्यास सांगितले आहे.

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेता आयुषमान खुराना आणि अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेला ‘गुलाबो सिताबो’ हा चित्रपट येणार आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपटगृह बंद असल्यामुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसापूर्वीच रिलीज करण्यात आला होता. तेव्हापासून हा चित्रपट चर्चेचा विषय ठरल्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनीदेखील नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यासाठी या चित्रपटाचा आधार घेतल्याचे पाहायला मिळत आहे.


या चित्रपटाच्या पोस्टरचा आधार घेत महाराष्ट्र पोलिसांनी, घर तुमचे, जमीन तुमची, मर्जी तुमची, पण बाहेर जाण्याची “परमिशन” आमची घ्यावी लागेल. तुमच्याच सुरक्षेसाठी. कोरोनाव्हायरस पासून सर्वात सुरक्षित ठिकाण आहे तुमची स्वतःची “हवेली”. विनाकारण बाहेर जाऊ नका, सुरक्षित राहा. #StayHome #StaySafe असे ट्विट केले होते. आयुषमानने देखील महाराष्ट्र पोलिसांचे हे ट्विट पाहिल्यानंतर लगेच ते रिट्विट करत, अगदी बरोबर. घरात सुरक्षित, बाहेर सध्या नाही, असे ट्विट मराठीत केले आहे.

दरम्यान, सोशल मीडियात सध्या महाराष्ट्र पोलीस आणि आयुषमान खुरानाच्या मराठी ट्विटची चांगलीच चर्चा होत आहे. ‘गुलाबो सिताबो’ या चित्रपटात आयुषमान मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आयुष्मान आणि बिग बी या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. १२ जून रोजी हा चित्रपट अॅमेझॉन प्राईमवर रिलीज करण्यात येणार आहे.

Leave a Comment