चारधाम जोडणारा अवघड बोगदा बीआरओने मुदतीपूर्वी केला पूर्ण

फोटो साभार कॅच न्यूज

हृषीकेश आणि धरासू मार्गावरील अति वर्दळीच्या चंबा या शहराच्या खालून ४४० मीटरचा चारधाम जोडणारा बोगदा सीमा सडक संघटन म्हणजे बीआरओने मुदतीपूर्वी पूर्ण केला असून त्याबद्दल रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बीआरओचे खास कौतुक केले आहे. विशेष म्हणजे देशात करोना संकटामुळे अनेक प्रकल्प ठप्प झाले असतानाही या बोगद्याचे कौशल्याचे काम वेळेपूर्वी पूर्ण झाले आहे.

गडकरी या संदर्भात म्हणाले, राष्ट्रीय निर्माण कार्यात हे असाधारण यश आहे. यामुळे गंगोत्री, केदारनाथ, यमुनोत्री आणि बद्रीनाथ या प्रवासाची सुविधा अधिक चांगल्या प्रकारे मिळणार आहे. करोना संकटात सुद्धा हे काम पूर्ण क्षमतेने आणि सर्व अडचणींचा सामना करून सुरु ठेवले गेले आणि ऑक्टोबर २०२० मध्ये पूर्ण होणारे काम मे महिन्यातच पूर्ण केले गेले. या बोगद्यामुळे ही पवित्र चारधामना ऑल वेदर कनेक्टीव्हीटी राहणार असून हा मैलाचा दगड म्हणता येईल.

फोटो साभार नई दुनिया

या बोगद्यामुळे यात्रेकरूंचा प्रवास सुखाचा होणार आहेच पण आर्थिक समृद्धीसाठी त्याचा हातभार लागणार आहे. बीआरओचे चीफ लेफ्टनंट जनरल हरपालसिंग म्हणाले ऑस्ट्रियन तंत्रज्ञानाचा वापर या बोगद्यासाठी केला गेला. ९०० किमीचा प्रवास असलेल्या या चारधाम प्रवासात गंगोत्री आणि बद्री यांच्या मधील २५० किमीच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असून या सर्व प्रकल्पासाठी १२ हजार कोटी खर्च येणार आहे. केदारनाथ येथे झालेल्या दुर्घटनेनंतर लगेच ऑलवेदर कनेक्टीव्हीटी बद्दल निर्णय घेतला गेला होता.

Leave a Comment