करोना रूग्णांसाठी खास इनहेलर तयार

फोटो साभार डेली मिरर

ब्रिटीश वैज्ञानिकांनी खास करोना रुग्णांसाठी एक विशेष इनहेलर विकसित केला असून त्यामुळे करोना संक्रमित रुग्णांना करोना विषाणूविरुद्ध लढा देण्यास मदत मिळणार आहे. साउथम्पटन विद्यापीठातील संशोधकांनी या इनहेअर मध्ये असे औषध वापरले आहे की ज्यामुळे करोना संक्रमणाचा फुफुसावर होणारा परिणाम कमी करता येतो. एसएनजी ००१ असे याचे कोड नेम आहे.

या औषधात एका खास प्रोटीनचा वापर केला गेला आहे. त्याला इंटरफेरान बीटा असे म्हटले जाते. हे प्रोटीन जेव्हा एखाद्याच्या शरीरात करोना विषाणू पोहोचतो तेव्हा नैसर्गिक रित्याच शरीरात तयार होतेच. याच्याच मदतीने रुग्ण करोना विषाणूशी लढा देऊ शकतो.

या इनहेलर आणि औषधाच्या १२० रुग्णावर चाचण्या सुरु असून संशोधनात हॉंगकॉंग येथे अन्य औषधांबरोबर याचा वापर केला गेला. त्या सर्व रुग्णांची करोना लक्षणे कमी झालेली आढळली. इनहेलर मुळे हे औषध थेट फुफुसात जाते आणि विषाणूचा प्रभाव कमी होऊ लागतो. त्यामुळे रुग्ण गंभीर होण्यापासून बचाव होतो. या वर्षाअखेर या औषधाचे १ लाख डोस तयार करण्यात येणार आहेत. चाचण्या यशस्वी झाल्या तर करोनाची लक्षणे दिसताच ७२ तासाच्या आत हे इनहेलर एक दिवसाला एक डोस या प्रमाणात दिले जाईल असे समजते.

रुग्णांवर घेतल्या गेलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष जुलै मध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

Leave a Comment