आता मराठीत पुनःप्रदर्शित होणार ‘रामायण’ मालिका


मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन लागू झाल्यानंतर काही दिवसातच केंद्र सरकारने रामानंद सागर निर्मित अजरामर ‘रामायण’ ही मालिका दूरदर्शनवर दाखविण्याचा निर्णय घेतला होता. दूरदर्शनसाठी सरकारने घेतला हा निर्णय फारच चांगला ठरला होता. कारण रामायण दाखविण्यास सुरुवात झाल्यानंतर दूरदर्शनच्या टीआरपीमध्ये चांगलीच सुधारणा झाली होती. दरम्यान, आपण आजवर रामायण मालिका हिंदीत पाहिली होती. मात्र, हीच सुप्रसिद्ध मालिका आता मराठीत पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाह या चॅनलवर रामानंद सागर निर्मित रामायण ही पौराणिक मालिका पहिल्यांदाच मायबोली मराठी भाषेतून पाहता येणार आहे. आजही या पौराणिक मालिकेची जादू तसूभर कमी झालेली नाही. प्रेक्षकांना ही मालिका आजही तितकाच आनंद देते. ही फक्त मालिकाच नाही तर हा मनामनात रुजलेला संस्कार आहे. अलौकिक निष्ठा, पवित्र प्रेम, आणि असामान्य श्रद्धेची गोष्ट पहिल्यांदाच मराठीतून अनुभवायला मिळणे ही प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी असणार आहे. १ जूनपासून रात्री ९ वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे याविषयी सांगताना म्हणाले की, एवढी महान कथा, संस्कार शिकवणारी, आयुष्य घडवणारी मालिका पहिल्यांदाच स्टार प्रवाहवर येत आहे याचा आनंद आणि अभिमान आहे. आपल्या भाषेतील प्रभु श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण, हनुमान कसे दिसतील? आणि कसे वाटतील? हे पाहायला नक्की आवडेल. माझी खात्री आहे मराठीमध्येही ही मालिका तितकीच प्रभावी ठरेल.

Leave a Comment