रेल्वेचा निष्काळजीपणा कायम; 342 मजुरांना वाटेतच सोडून निघून गेली रेल्वे


नवी दिल्ली : भारतीय रेल्वे ही कोरोनामुळे देशात सुरु असलेल्या लॉकडाऊन दरम्यान आपल्या सेवेच्या अभावामुळे खूपच चर्चेत आहे. केंद्र सरकारच्या आदेशानंतर लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात देशातील विविध राज्यात अडकून पडलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचविण्यासाठी रेल्वेने पुढाकार घेतला. पण या दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून होत असलेल्या भोंगळ कारभारामुळे त्यांची चर्चा देखील तेवढीच होत आहे.

सोमवारी अशाच एका निष्काळजीपणाचे मोठे उदाहरण समोर आले आहे. सुमारे 400 मजुरांना महाराष्ट्रातून घेऊन एक रेल्वे ओडिशाला निघाली होती, पण ही गाडी सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास झारखंड राज्यातील कानारोवा स्टेशनवर पोहचल्यानंतर, ही रेल्वे काही काळासाठी स्टेशनवरच थांबविण्यात आली. उन्हामुळे आणि सलग प्रवासामुळे कंटाळलेले सुमारे 350 प्रवासी मजूर या काळात रेल्वेतून खाली उतरले आणि त्यांनी थंडाव्यासाठी जवळपासच्या झाडांच्या सावलीचा आसरा घेतला. तर त्यातील काहीजणांनी पोटापाण्याच्या व्यवस्थेचा शोध सुरु केला. याच काळात रेल्वे सुरु झाली आणि सुमारे 342 प्रवाशांची रेल्वे चुकली आणि हे प्रवासी स्टेशनवरच राहिले.

महाराष्ट्रातील रेड झोन असलेल्या शहरांतून आपआपल्या राज्यात जाणाऱ्या या प्रवासी मजुरांची रेल्वे सुटल्याने स्थानिक प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. या घटनेबाबत बानोचे गटविकास अधिकारी समीर सलखो यांच्या म्हणण्यानुसार, स्टेशन मास्तरांचा निष्काळजीपणा या परिस्थितीला जबाबदार आहे. राऊरकेला स्टेशनवर या मजुरांना उतरायचे होते, पण आता हे मजूर कानारोवा स्टेशनवर उतरल्याने प्रशासनाच्या अडचणीत भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाकडून आता या मजुरांना त्यांच्या अपेक्षित ठिकाणी पोहचविण्यासाठी बसची व्यवस्था करण्याचे काम करत आहे, त्याचबरोबर या मजुरांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थाही करण्यात येते आहे.

दुसरीकडे निष्काळजीपणाचा आरोप कानारोवाचे स्टेशन मास्तर कल्याण टोप्पो यांनी फेटाळला आहे. या रेल्वेसाठी हिरवा कंदिल दाखविण्यात आला होता, पण रेल्वेच्या इंजिनात झालेल्या बिघाडामुळे ड्रायव्हरने ही रेल्वे थांबविल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दुरुस्तीनंतर या ड्रायव्हरने रेल्वे सुरु केली, त्याने प्रवासी नेमके कुठे आहेत, याकडे दुर्लक्ष केल्याचे स्टेशनमास्तरांचे म्हणणे आहे. काही जणांनी चेन ओढून रेल्वे थांबविण्याचाही प्रयत्न केला, मात्र तरीही रेल्वे थांबली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. स्टेशनवर राहिलेले 342 प्रवासी हे ओडिशातील भद्रक, कटक, भुवनेश्वरसह वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. आता त्यांना घरी पाठविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

Leave a Comment