कोरोना इफेक्ट; पत्रकाराने फक्त एका डॉलरमध्ये विकत घेतली मीडिया कंपनी


जगभरातील अनेक उद्योगधंदे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डळमळीत झाले आहेत. त्याचबरोबर अनेकांचे दररोज कोट्यवधींचे नुकसान होत आहे. त्याचबरोबर अनेक देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक मोठमोठ्या कंपन्या डबघाईला आल्या आहेत. दरम्यान एका मीडिया कंपन्यांचीही अशीच काहीशी अवस्था झाली आहे. न्यूझीलंडमधील केवळ एका डॉलरला आर्थिक टंचाईमुळे बेजार झालेली ‘स्टफ’ ही न्यूझीलंडमधील नामांकित मीडिया कंपनी विकली गेली आहे.

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील आघाडीच्या मीडिया कंपन्यांपैकी एक म्हणून ‘स्टफ’ ही ओळखली जायची. ‘नाईन एंटरटेन्मेट’ या कंपनीकडे या कंपनीचे हक्क होते. यासंदर्भातील वृत्त गार्डियनने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार प्रामुख्याने अनेक नामांकित वर्तमानपत्र व नियतकालिकांची छपाई करण्याचे काम ही कंपनी करते. त्याचबरोबर ‘स्टफ’ या नावाची त्यांची एक वेबसाईट देखील आहे. पण त्यांचा कॅश प्लो लॉकडाउनमुळे पूर्णपणे थांबला. तसेच ज्या अमेरिकी कंपन्यांमध्ये त्यांनी पैसे गुंतवले होते त्या सर्व कंपन्या डबघाईला गेल्या. परिणामी स्टफला कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यामुळे कुठलाही व्यावसायिक आर्थिकदृष्ट्या रसातळाला गेलेली ही कंपनी खरेदी करण्यास तयार नव्हता. अखेर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिनेड बाउचर यांनी केवळ एक न्यूझीलंड डॉलर अर्थात भारतीय चलनानुसार ४६.४१ (आजचा भाव) रुपयांना ही कंपनी विकत घेतली.

सध्या ४०० पत्रकार आणि ८०० इतर कर्मचारी स्टफ कंपनीत काम करत आहेत. गार्डियनला दिलेल्या मुलाखतीत ‘नाईन एंटरटेन्मेट’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ह्यूग मार्क्स यांनी या व्यवहारामागचे कारण सांगितले. ते म्हणाले, ‘स्टफ’ने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याआधीच आर्थिक दिवाळखोरी जाहीर केली होती. त्यांची उरलेली आशाही कोरोनामुळे संपली. सिनेड बाउचर एक हुशार व्यक्ती आहेत. त्यांनी विचार करुनच स्टफला खरेदी केले असणार. मला आशा आहे की या कंपनीचे सुवर्ण युग ते पुन्हा एकदा परत आणतील.

Leave a Comment