स्थलांतरित मजुरांसाठी सोनू सुदने जारी केला ‘टोल फ्री’ नंबर


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या स्थलांतरीत आणि मंजूर वर्गासाठी अभिनेता सोनू सूद याने स्वतंत्र बससेवा सुरु करत, या मजुरांना त्यांच्या गावी सुखरुप पोहोचवले आहे. सोनू सूदच्या टीमने आत्तापर्यंत १२०० पेक्षा जास्त लोकांची घरवापसी केली आहे. विशेष म्हणजे, आम्ही हे काम शेवटच्या प्रवासी, मजूरापर्यंत सुरुच ठेवणार असल्याचे सोनुने म्हटले आहे. सोनू सूदकडून मुंबईत अडकलेल्या आणि उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक किंवा इतर कुठल्याही राज्यात, संबंधित राज्य सरकारच्या परवानगीने स्थलांतरित नागरिकांना घरी पोहचविण्याचे काम करण्यात येत आहे. त्यासाठी, सोनू सूदने आता एक टोल फ्री क्रमांक जारी केला आहे.

लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी अभिनेता सोनू सूद देवदूत ठरला आहे. सोनूने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हजारो स्थलांतरीत मजूरांना गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या घरी रवाना केले. सर्वस्तरातून सोनूच्या या कामाचे कौतुक होत आहे आणि त्याचमुळे सोनू सोशल मीडियावर देखील ट्रेंड करत आहे. तर, सोनू सूदचे कामगार वर्गाकडून व सेलिब्रिटींकडूनही कौतुक होत आहे. विशेष म्हणजे बिहारमधील काही युवकांनी सोनू सूदचा पुतळा उभारण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण ते पैसे गरिबांच्या मदतीसाठी वापरा असा रिप्लाय सोनूने दिला. आजपर्यंत ट्विटर अकाऊंटवर सोनूला टॅग करुन मदत मागितली जात होती. आता, सोनूने एक टोल फ्री नंबर जारी केला आहे.


याबाबतची माहिती देण्यासाठी सोनू सुदने एक ट्विट केले आहे. त्यात सोनू सांगतो की, माझ्या प्रिय बंधु व भगिनींनो, जर तुम्ही मुंबईत आहात आणि तुमच्या घरी जाऊ इच्छिता. तर, कृपया या 18001213711 टोल फ्री नंबरवरुन आमच्याशी संपर्क साधा. तुम्ही किती लोक आहात, कुठे आहात आणि कुठे जाऊ इच्छिता याबाबतची सविस्तर माहिती द्या. तुम्हाला माझी टीम शक्य ती सर्वच मदत करेल. बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणने देखील सोनूच्या या कामाचे कौतुक केले असून एका युजरने सोनू सूद सिंघमवाला काम कर रहे है.. अशा शब्दात सोनूचे कौतुक केले आहे.

दरम्यान, सोनू करत असलेल्या समाजसेवेला काहींनी राजकारण, तर काहींनी हा पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे. त्यांना एका वृत्तवाहिनीशी बोलताना सोनूने उत्तर दिले आहे. कुठल्याही पब्लिसिटीची मला गरज नाही. मी मजुरांची मदत करत आहे. हे तेच मजुर आहेत सध्या ज्यांच्या हाताला सध्या काम नाही. आई-वडील लहान लहान मुलांना घेऊन शेकडो किमी पायपीट करत निघाले आहेत. त्यांच्या वेदना त्यांनाच ठाऊक असणार आणि मी त्याच वेदना कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. कोणत्याही मीडिया पर्सनला मी बोलावले नाही. तुम्ही मजूरांची बस रवाना करा, तेव्हा आम्हाला बोलवा, असे अनेक मीडिया पर्सनचे मॅसेज मला येतात. पण मी अशा कुठल्याही प्रसिद्धीच्या फंदात पडलेलो नाही. रोज शेकडो कॉल व मॅसेज घरी जाण्यासाठी येत आहेत. मी एकटा हे सांभाळू शकत नसल्यामुळे एक टीम मी तयार केली आहे आणि हे सर्व काम ते सांभाळत असल्याचे सोनूने सांगितले.

Leave a Comment