राज्यपालांशी राज ठाकरेंचा पहिल्यांदाच पत्रव्यवहार


मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढतच असून राज्य सरकारने अशा परिस्थितीत विद्यापीठाच्या परीक्षा घेण्यास नकार दिला. पण यावर नाराजी व्यक्त करत राज्यपालांनी परीक्षा घेण्याचा आग्रह केला. आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या वादात उडी घेतली आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण राज्यातील विद्यापीठांचे कुलपती आहात, असे म्हणत पहिल्यांदाच राज्यपालांना पत्र पाठवले आहे.

दरम्यान राज्यपालांना पाठवण्यात आलेल्या पत्रात राज ठाकरे यांनी, कोरोनामुळे राज्यात भीषण परिस्थिती आहे. त्यामुळे राज्यात गेल्या दोन महिन्यापासून लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यातच कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि पुण्यात आढळून आल्यामुळे या भागात किती दिवस लॉकडाउन राहिल हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत परीक्षा घेण्याचा अट्टाहास कशासाठी आणि कुणासाठी?, असा सवाल राज यांनी उपस्थितीत केला.

या रोगाचा प्रादुर्भाव किती जबरदस्त आहे, हे तुम्ही देखील जाणता असे मी मानतो. मग एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे आरोग्य धोक्यात घालण्यामागे नक्की प्रयोजन काय? दोन महिन्याचा लॉकडाउन देशाने सहन केला. जीव वाचला तर पुढे सगळे शक्य आहे. मग याच न्यायाने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यायला हरकत काय आहे?, असा थेट सवाल राज यांनी राज्यपालांना विचारला.

त्याचबरोबर परीक्षा रद्द करणे म्हणजे विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे असे होत नाही. आधीच्या सेमिस्टर्सच्या किंवा महाविद्यालयात घेतलेल्या अंतर्गत परीक्षांच्या गुणाच्या आधारे निकाल लावता येईल. मला खात्री आहे की, या विषयी शिक्षणतज्ज्ञांनी मार्गदर्शन केले असेल. जर तसे नसेल तर आमचे शिष्टमंडळ विद्यापीठांना या विषयी नक्की मार्गदर्शन करेल, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला. या परीक्षा निव्वळ विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून आणि अभूतपूर्व परिस्थिती लक्षात घेऊन रद्द कराव्यात आणि यात कुठल्याही राजकारणाला तुम्ही थारा देऊ नये, अशी विनंतीही राज यांनी केली.

Leave a Comment