धोनीला बिर्याणी न दिल्यामुळे संपुष्टात आली माझी कारकिर्द !


भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार म्हणजेच कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनी याला बिर्याणी किती आवडते याची आपल्यापैकी अनेकांना माहिती आहे. त्याचबरोबर एका मुलाखती दरम्यान माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने धोनीच्या बिर्याणी प्रेमाबद्दल सांगितले होते. बिर्याणी आणि बटर चिकनवर धोनी दिलखुल्लास ताव मारतो. त्यानंतर जिममध्ये धोनी वेळ घालवत नाही. तरीही धोनीच खेळपट्टीवर सर्वात जलद धावा घेतो अशी आठवण कैफने सांगितली होती. पण धोनी कर्णधार झाल्यावर त्याच बिर्याणीने बहुतेक आपली कारकिर्द संपुष्टात आल्याचे कैफ म्हणाला.

एका क्रीडा संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत माझी कारकिर्द बहुतेक धोनीला मी बिर्याणी न दिल्यामुळेच संपल्याचे कैफ मजेत म्हणाला. कैफने पुढे सांगितले, मी २००६ साली रणजी क्रिकेटच्या अंतिम सामन्यात शतक ठोकले आणि माझ्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशच्या संघाला विजेतेपद मिळाले. मी त्यावेळी माझ्या घरी एक मेजवानी ठेवली होती. त्या मेजवानीमध्ये बिर्याणी होती. त्यावेळी माझ्या घरी सचिन, गांगुली, द्रविड यांसारखे खूप दिग्गज खेळाडू आले होते. एवढ्या मोठ्या खेळाडूंच्या पाहुणचारात काहीही कमी पडू नये म्हणून मी खूप वेळ त्यांच्यासोबतच बसलो होतो.

दुसऱ्या रूममध्ये धोनी, सुरेश रैना, इरफान पठाण यांसारखे नवे खेळाडू बसले होते. पण मला वरिष्ठ खेळाडूंच्या पाहुणचारामुळे नव्या खेळाडूंकडे लक्ष देता आले नाही आणि नेमका २००७ ला धोनी संघाचा कर्णधार झाला. धोनी नेहमी मला भेटला की मजेत म्हणतो की मी घरी आलो तेव्हा तू मला बिर्याणीचा आग्रह केला नव्हता. बहुतेक त्याच बिर्याणीने माझ्या कारकिर्दीचा बळी घेतला, असे हसत हसत अत्यंत मजेशीर पद्धतीत मोहम्मद कैफ म्हणाला.

Leave a Comment