गुगल मॅप्समुळे आपले वैवाहिक जीवन आले धोक्यात; पोलिसांत तक्रार दाखल


आपल्यापैकी अनेकजण कोण्या अनोळखी जागी गेले असतील तर त्यांना या डिजीटल युगात मार्ग दाखवण्याचे गुगलचे सर्वाधिक लोकप्रिय मॅप्स हे अॅप करते. त्याचबरोबर आपल्यापैकी अनेकांच्या मोबाईलमध्ये हे अॅप हमखास असतेच. दरम्यान जगातील सर्वोत्तम नॅव्हिगेशन अ‍ॅप्सपैकी एक असलेले हे अ‍ॅप ५०० कोटीहून अधिक युझर्सने डाऊनलोड केल्याचे गुगल प्लेवरील आकडेवारी दाखवत आहे. म्हणूनच गुगल प्लेवर या अ‍ॅपचे पाच पैकी ४.३ एवढे रेटींग आहे. पण असे असले तरी गुगलला याच मॅप्समुळे तामिळनाडूमधील एका व्यक्तीने थेट न्यायालयात खेचण्याची तयारी सुरु केली आहे. या मॅप्सवर ही व्यक्ती एवढी संतापली आहे की गुगल मॅप्सविरोधात त्या व्यक्तीने स्थानिक पोलिसांकडे तक्रारही केली आहे.

गुगल मॅप्सविरोधात तामिळनाडूमधील नागापट्टिनम जिल्ह्यातील मायलादुथुरैमध्ये राहणाऱ्या ४९ वर्षीय आर चंद्रशेखर यांनी पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली आहे. आपले वैवाहिक गुगल मॅप्समुळे जीवन धोक्यात आल्याचा आरोप चंद्रशेखर यांनी केला आहे. या संदर्भात द न्यूज मिनीटने वृत्त दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार चंद्रशेखर यांच्या फोनमधील गुगल मॅप्समध्ये ज्या ठिकाणांना त्यांनी भेट दिली नाही त्या ठिकाणांचीही हिस्ट्री दाखवली जात आहे. म्हणजेच ज्या ठिकाणांवर चंद्रशेखर हे गेलेले नाहीत गुगल मॅप्स त्या ठिकाणी ते जाऊन आल्याचे दाखवत असल्यामुळे माझ्यावर माझी पत्नी संशय घेते. ती अनेकदा मला मी कुठे कुठे जातो यासंदर्भातील प्रश्न विचारते. त्यामुळे आमच्या वैवाहिक आयुष्यातील शांती भंग झाली असून आमचे वैवाहिक जीवन धोक्यात आल्याचे चंद्रशेखर यांनी पोलिसांना सांगितले आहे.

माझी पत्नी मागील काही महिन्यांपासून गुगल मॅप्सवरील युआर टाइमलाइन हा पर्याय वापरुन मी कुठे कुठे गेलो होतो हे पाहते आणि रात्रभर मला प्रश्न विचारत बसते. यामुळे माझी झोपही पूर्ण होत नाही. या अॅपवरील माहितीमुळे मी सतत कुठे जातो याचा विचार ती करत असते. माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांवरही याचा परिणाम होत आहे. अनेकदा तिला याबद्दल मी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण गुगल मॅप्सवरील माहितीवर तिचा विश्वास असल्यामुळेच माझ्या आयुष्यात गुगलने खूप अशांतता निर्माण केली आहे म्हणूनच मी तुम्हाला विनंती करतो की गुगलवर कारवाई करुन मला न्याय मिळवून द्यावा. तसेच या प्रकरणामुळे मला तो मानसिक त्रास झाला आहे त्यासाठी गुगलने भरपाई द्यावी, अशी मागणी चंद्रशेखर यांनी पोलिसांकडे केलेल्या अर्जात केली आहे. दरम्यान पोलिसांनी हा तक्रार अर्ज स्वीकारला असला तरी त्यांनी या प्रकरणात एफआयआर दाखल करुन घेतलेली नाही. या दोघांचे समोपदेशन करण्यासाठी पोलीस त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment