अमेय खोपकर यांची मागणी; खोटी माहिती देणाऱ्या किरीट सोमय्यांना तात्काळ अटक करा


मुंबई – राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेच. पण त्यात सर्वात दयनीय अवस्था देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची झाली आहे. त्यातच राज्यातील सरकारला त्यांच्या कर्तव्याची जाण करुन देण्यासोबतच त्यावरुन सरकारला ट्विटरच्या माध्यमातून भाजप नेते किरीट सोमय्या दिसत असतात. त्यातच त्यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ ट्विट केला होता. पण सोमय्या यांनी पोस्ट केलेला एक व्हिडिओ चुकीचा असल्याचे स्पष्टीकरण थेट मुंबई पोलिसांनीच दिले आहे.

आता महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी याच मुद्द्यावरुन खोट्या बातम्या पसरवल्याप्रकरणी सोमय्या यांना अटक करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालय, मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस आयुक्तांच्या ट्विटर हॅण्डलला टॅग करुन ट्विटवरुन खोपकर यांनी एक पोस्ट केली आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विटच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार खोट्या बातम्या पसरवणे गुन्हा असल्याचे म्हटले आहे. खोटी माहिती पसरवणाऱ्याला आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५४ अंतर्गत एक वर्ष तुरुंगवास होऊ शकतो. मार्च महिन्यात हा इशारा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिल्याचा उल्लेख खोपकर यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे. याच कायद्याच्या आधारे त्यांनी किरीट सोमय्या यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. मुंबई पोलिसांनी विनंतीवजा आवाहन आहे की या कायद्याचा आदर राखत किरीट सोमय्या यांना अटक करावी. त्यांचे सोशल मिडियावरील उद्योग लोकांनी बघितलेच आहेत. खोट्या बातम्या पसरवणे हा कायद्याने गुन्हा आहे हे सुद्धा लोकांना कळायला पाहिजे, असे खोपकर यांनी म्हटले आहे.


सोमय्या यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला पोलीस अधिकारी गाडीची वाट पाहता उभी असल्याचे दिसत होते. या महिलेला कोरोनामुळे श्वास घेण्यास अडचण येत होती. तरीही तिला बराच वेळ रुग्णवाहिकेसाठी वाट पाहत उभे राहावे लागले, असे सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. पोलिसांनी चूक निदर्शनास आणून दिल्यानंतर सोमय्या यांनी हे ट्विट डिलीट केले आहे.

आता मुंबई पोलिसांनी ट्विटवरुन सोमय्या यांनी केलेला दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट केले आहे. तुम्ही आमची काळजी करता याबद्दल बरे वाटले, पण हा व्हिडिओ १६ मे २०२० चा असून तो करोनाशी संबंधित नाही. ही महिला कोविड योद्धा असून ती अगदी ठणठणीत आहे आणि ती कोरोनाग्रस्त नाही. सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करतो की माहितीची खात्री करुन घेतल्याशिवाय ती शेअर न करण्याचे मुंबई पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment