दारुच्या दुकानापर्यंत सोड असे सांगणाऱ्याला सोनू सुदने दिले असे उत्तर


देशभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी २५ मार्चपासून देशव्यापी लॉकडाउन सुरु आहे. पण लॉकडाउनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक स्थलांतरित मजुरांचे हाल झाले आहेत. लॉकडाऊनमध्ये वारंवार होत असलेल्या वाढीमुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये अडकून पडलेल्या मजुरांनी आता ज्या मिळेल त्या साधनाचा आधार घेत आपल्या राज्याची वाट धरली आहे. त्यातच काही मजूरांनी पायी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे देशातील अनेक राज्यांमधून मागील जवळजवळ दोन महिन्यांपासून मजूर चालत आपल्या राज्यांमध्ये परत जाताना दिसत आहे. पण श्रमिक विशेष ट्रेन्सच्या माध्यमातून तिसऱ्या आणि चौथ्या लॉकडाउनमध्ये मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचवण्याची सुविधा देण्यात आली आहे. पण सरकारकडून या गाड्या सोडल्या जात असल्या तरी अनेक श्रमिकांना आपल्या राज्यात पोहचण्यात अडचणी येत आहेत.

त्याचीच दखल घेत स्थलांतरित मजुरांना त्यांच्या सोडवण्याचे काम त्याचबरोबर त्यांच्या खाण्याची व्यवस्था करत असलेला अभिनेता सोनू सुद सध्या बराच चर्चेत आहे. परराज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना सोनूने त्यांच्या राज्यात पोहचवण्याची ‘घर भेजो’ मोहिम हाती घेतली आहे. सोनूने यासाठी पुढाकार घेतला असून मुंबईसहित तो देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये अडकलेल्या उत्तरेतील मजुरांना घरी पोहचवण्यासाठी बस गाड्यांची सोय करताना दिसत आहे.

सध्याच्या घडीला थेट ट्विटवरुन मदतीची मागणी करणाऱ्यांची संख्या सोनूकडे वाढली आहे. सोनू या लोकांना थेट ट्विटरच्या माध्यमातूनही मदत करताना दिसत आहे. असे असतानाच सोनूकडे एका व्यक्तीने एक अजबच मागणी केली आणि सोनूने त्याला तेवढ्याच हटके पद्धतीने आणि भन्नाट उत्तर दिले आहे.


लॉकडाउन सुरु झाल्यापासून देशभरात बंद असलेली दारुची दुकाने दोन आठवड्यांपूर्वी सुरु करण्यात आली. दारुच्या दुकानांना चौथ्या लॉकडाउनदरम्यान परवानगी मिळाल्यानंतर लांबच लांब रांगा दारुच्या दुकानांसमोर दिसल्या. सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडून अनेक मद्यप्रेमी या रांगांमध्ये उभे असल्याचे चित्रही पहायला मिळाले. कामगारांना घरी पोचवण्यासाठी मदत करणाऱ्या अशाच एका मद्यप्रेमीने मद्यप्रेमापोटी ट्विटवरुन थेट सोनूची मदत मागितली. या व्यक्तीने सोनू भाऊ, मी माझ्या घरात अडकलो असून मला दारुच्या दुकानापर्यंत पोहचव, अशी विनंती ट्विटच्या माध्यमातून केली.

तर या मजेदार ट्विटला सोनूनेही तेवढ्याच हटके पद्धतीत उत्तर दिले आहे. भावा, मी तुला दारुच्या दुकानापासून तुझ्या घरापर्यंत पोहचवू शकतो. गरज लागली तर मला सांग, असे उत्तर सोनूने या ट्विटला दिले आहे. सध्या सोनूचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे.

Leave a Comment