योगींच्या आरोपाला रोहित पवारांचे सणसणीत उत्तर


मुंबई – एकीकडे देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत असतानाच दुसरीकडे देशातील राजकीय वातावरण देखील आता कमालीचे तापू लागले आहे. त्यातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारवर स्थलांतरित मजुरांचा छळ केल्याचा आरोप केल्यानतंर त्यात आणखी भर पडली आहे. आदित्यनाथांच्या या आरोपांचा राज्यातील नेत्यांनी खरपूस समाचार घेत त्यांना प्रतिउत्तर देखील दिले आहे. या नेत्यांसोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देखील योगींच्या त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.


रोहित पवारांनी यावर ट्विटरच्या माध्यमातून भाष्य करताना, महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान असलेल्या स्थलांतरित मजुरांनी स्वगृही जाण्याचा आग्रह धरल्यानंतर #मविआ सरकारने सीएम फंडातून त्यांच्या प्रवासाची सोय केल्याचे म्हटले आहे. त्याचबरोबर या मजुरांना आज क्वारंटाईन करण्याची, त्यांची अधिकाधिक टेस्ट करण्याची, त्यांना रोजगार देण्याची खरी गरज आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्र सरकारवर आगपाखड करण्यापेक्षा राज्यामध्ये अधिकाधिक कोरोना टेस्ट करून जनतेच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला देखील रोहित पवारांनी दिला आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरून कानउघाडणी केल्यानंतर महाराष्ट्र सरकारला देखील आमदार रोहित पवार यांनी एक मोलाचा सल्ला दिला. राज्यावरील कोरोनाचे संकट टळल्यानंतर राज्यात परराज्यातून येणाऱ्या प्रत्येक मजुरांची पोलीस नोंदणी व आरोग्य तपासणी करूनच त्यांना महाराष्ट्रात प्रवेश द्यावा कारण अशा कोणत्याही नोंदी योगी सरकारकडे नसल्याचे स्पष्ट झाल्याचा सल्ला त्यांनी महाराष्ट्र सरकारला दिला आहे.

Leave a Comment