पियुषजी, तुम्ही राज्यसभेत महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहात हे विसरु नका; राऊतांचा रेल्वेमंत्र्यांना टोला


मुंबई: काल रात्रीपासून रेल्वेमंत्री आणि महाराष्ट्र सरकारमध्ये श्रमिक ट्रेनच्या मुद्द्यावरुन ट्विटर वॉर सुरु आहे. आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या शाब्दिक लढाईत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना पुन्हा टोला लगावला आहे. पियुषजी, महाराष्ट्रातून तुम्ही राज्यसभेवर निवडून गेला आहात, हे विसरु नका, असा खोचक टोला राऊत यांनी दिला. त्याचबरोबर रेल्वेकडून १४ मे रोजी चालवण्यात आलेल्या नागपुर-उधमपूर ट्रेनच्या विलंबावरूनही राऊत यांनी रेल्वेमंत्र्यांना लक्ष्य केले.


दरम्यान ट्विटरवरुन राऊत यांनी गोयल यांना नागपुर-ऊधमपुर ट्रेन साठी कोठली यादी घेतली होती. आधी ट्रेन नंतर माणसे जमा करण्यासाठी काय कष्ट घेतले, कृपया जाहीर कराल? मग आता यादी कसली मागताय?, असा सवाल विचारला आहे. १४ मे रोजी चालवण्यात आलेली नागपुर- उधमपूर ट्रेन तब्बल नऊ तास उशीरा आली होती. त्यामुळे या ट्रेनला उधमपूरमध्ये जाण्यासही विलंब लागला होता. या सगळ्यामुळे ट्रेन सुटण्याच्या वेळेत स्टेशनवर आलेल्या मजुरांची मोठी गैरसोय झाली होती.

दरम्यान, कालही पियुष गोयल यांच्यावर संजय राऊत यांनी बोचरी टीका केली होती. महाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियुषजी, फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोहचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचु नये, असे राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.

Leave a Comment