ई-पाससाठी चाकरमान्यांची लुबाडणूक, नितेश राणेंचा गंभीर आरोप


मुंबई : संपूर्ण देशात जीवघेण्या कोरोना थैमान घातले असून कोरोनाबाधितांच्या देशातील सर्वाधिक संख्या ही एकट्या महाराष्ट्रात आहे. त्यातच राज्यातील मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांमधील कोरोनाग्रस्तांची संख्य लक्षणीय आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यातील देखील लॉकडाऊन सुरु आहे.

राज्यातील लॉकडाऊन हा चौथ्या टप्प्यातील असून या टप्प्यात केंद्र तसेच राज्य सरकारकडून नियमांमध्ये काहीअंशी शिथिलता देण्यात आली आहे. त्यानुसार इतर जिल्ह्यात जाण्यास राज्य सरकारने परवानगी दिल्यामुळे कोकणाकडे अनेक चाकरमानी निघाले आहेत. पण या चाकरमान्यांसाठी जिल्हाबंदी असल्यामुळे त्यांना ई-पास काढणे बंधनकारक आहे. पण या ई-पाससाठी काही दलालांकडून प्रत्येकी 5 हजार रुपये उकळले जात असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे.


ई-पाससाठी एका महिलेसोबत मोबाईल संवादाचे ऑडिओ ट्विट नितेश राणे यांनी केले आहे. ही महिला यामध्ये ई-पास काढून देण्याची हमी देत आहे. ही महिला आधार कार्ड, गाडीचा नंबर घेऊन अवघ्या 3 तासात ई-पास काढून देत असल्याचे सांगत आहे. या पाससाठी प्रत्येकी 5 हजार रुपये दर मोजावा लागत आहे. सध्या सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला ज्या कोकणातील चाकरमान्यांनी सर्वकाही दिले त्या चाकरमान्यांची त्यांच्या सरकारकडूनच लूट केली जात असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला. या एजंटला कोणाची मदत आणि आशीर्वाद आहे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही राणे यांनी केली.

विशेष म्हणजे, ई-पास देण्यासाठी राज्य सरकारकडून ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले आहे आणि ई-पास या पोर्टलच्या माध्यमातूनच दिले जात आहे. पण असे असतानाही पैसे देऊन पास देण्याचा प्रकार घडत असल्याचा दावा नितेश राणे यांनी केला आहे.

Leave a Comment