अनुष्का शर्मावर रासुका लावा, भाजपच्या या आमदाराची मागणी

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या तिच्या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत बनलेल्या ‘पाताल लोक’ सीरिजमुळे चर्चेत आहे. अ‍ॅमेझॉन प्राईमवर पाताल लोक सीरिज काही दिवसांपुर्वीच रिलीज झाली असून, सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. मात्र या सीरिजसोबतच अनुष्का शर्मा वादात अडकली आहे. गाझियाबादच्या लोनी येथील भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांनी पाताल लोकवर आक्षेप घेत, अनुष्का शर्मा विरोधात तक्रार दाखल केली आहे.

गुर्जर यांचा आरोप आहे की, अनुष्का शर्मा यांनी एका वाँटेड माफियासोबत आमदार त्यांचा फोटो लावला आहे आणि गुर्जर समाजाविरोधात आक्षेपार्ह माहिती दिली आहे. गुर्जर यांची तक्रार आहे की वेब सीरिजमध्ये त्यांचा फोटो विना परवानगी वापरण्यात आला आहे व गुर्जर समाजाला चुकीच्या पद्धतीने चित्रित केले. एवढेच नाही तर आमदाराने अनुष्का शर्मा विरोधात रासुका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गुर्जर यांच्यानुसार, वेब सीरिजमध्ये गुर्जर जातीचे चित्रण डकैत म्हणून करण्यात आले आहे व त्यांना चुकीचे दाखवण्यात आले आहे. सनातन धर्माचे देखील चुकीचे चित्रण केले आहे. पाकिस्तानला दहशतवादी देशाच्या प्रतिमेपासून मुक्त करण्याचा प्रयत्न केला गेला आहे व जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलिन करण्यात आली आहे. त्यामुळे वेब सीरिजला त्वरित बंद करून रासुका अंतर्गत कारवाई करावी.

या आधी देखील लॉयर गिल्ड मेंबरचे सदस्य वकील वीरेन सिंह गुरूंग यांनी वेब सीरिजमध्ये जातिसूचक शब्दांचा वापर करत, गोरखा समुदायाचा अपमान करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या संदर्भात त्यांनी अनुष्का शर्माला नोटीस पाठवली आहे.

Leave a Comment