शेतकऱ्यांना दिलासा, किसान क्रेडिट कार्डवर विशेष सूट

कोरोना व्हायरसमुळे 25 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन आहे. या काळात शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. या पार्श्वभुमीवर आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने  हफ्ता भरण्यासाठी 31 मे पर्यंत मुदत दिली आहे.

किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकऱ्यांना 1.6 लाख रुपयांचे कर्ज विना गॅरंटी मिळते. याद्वारे शेतकरी 3 वर्षात 5 लाख रुपये कर्ज घेऊ शकतात. यावर व्याज देखील कमी असते. सरकारने कमी कालावधीच्या कर्जासाठी 31 मे पर्यंत हफ्ता भरण्याची मुदत दिली आहे. लॉकडाऊननंतर शेतकऱ्यांना केवळ ईएमआय फॉर्म भरावा लागेल व कोणतीही अतिरिक्त पेनल्टी लागणार नाही. त्यांना 4 टक्के दराने व्याज द्यावे लागेल.

सरकारकडून हफ्ते भरण्याचा कालावधी आणखी वाढविण्याची शक्यता आहे, मात्र याची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.

किसान क्रेडिट कार्डवर तीन लाख रुपयांच्या कर्जावर सर्वसाधारणपणे 9 टक्के दराने कर्ज घेतले जाते. यात सरकार 2 टक्के सबसीडी देत असते. मात्र जर वेळेवर कर्ज फेडल्यास व्याजात 3 टक्के आणखी सूट मिळू शकते. अशाप्रकारे कोरोना व्हायरस संकटाच्या काळात या वाढलेल्या व्याजावर सवलत देत 31 मे पर्यंत शेतकऱ्यांकडून 4 टक्के दरानेच व्याज घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *